आजऱ्यात होणार उपजिल्हा रूग्णालय
By Admin | Updated: December 5, 2014 23:39 IST2014-12-05T20:42:30+5:302014-12-05T23:39:04+5:30
वेळ व पैशांची बचत

आजऱ्यात होणार उपजिल्हा रूग्णालय
ज्योतिप्रसाद सावंत - आजरा येथील ‘मृत्यूंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रूग्णालय असे विस्तारीकरण करण्यास शासनाच्या आरोग्य विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाली असून, यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा आजरा तालुकावासीय रूग्णांच्या दिमतीला राहण्याबरोबरच इमारतीचे विस्तारीकरणही करण्यात येणार असल्याने तालुकावासीय समाधान व्यक्त करीत आहेत.आजरा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (श्रेणी १) डॉ. एस. ए. कुरुंदवाडे यांना आरोग्य विभागाकडून सदर श्रेणीवर्धनाबाबत रीतसर पत्र आले आहे. सद्य:स्थितीला आजरा ग्रामीण रूग्णालयात
३० खाटांची व्यवस्था आहे. बऱ्यापैकी ‘अवघड’ उपचारांकरिता गडहिंग्लज अथवा छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाशिवाय सर्वसामान्य रूग्णांना पर्याय नव्हता; परंतु शासनाच्या या निर्णयाने तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफा आजरा येथील उपजिल्हा रूग्णालयात सुसज्ज राहणार आहे. गेल्या पाच वर्षामध्ये ग्रामीण रूग्णालयातून किती रूग्णांनी कोणते उपचार घेतले. रूग्णालयाच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती, वैद्यकीय सेवेची गरज, इत्यादी निकष विचारात घेऊन या रूग्णालयाचे रूपांतरण करण्यात येत आहे. ३० खाटांकरिता २६ कर्मचारी वर्ग, तर ५० खाटांकरिता ४६ कर्मचारी व अधिकारी नेमण्यात येणार आहेत. यामध्ये तब्बल ७ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
वैद्यकीय अधीक्षक, सहायक अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा रक्षक, आदींचाही यामध्ये समावेश राहणार असून, सोनोग्राफीसह अत्याधुनिक सुविधा तैनात करण्यात येणार आहेत.
सद्य:स्थितीला असणाऱ्या गांधीनगर येथील इमारतीच्या विस्तारीकरणास संधी असल्याने मूळ इमारतीचेच विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सदर इमारतीचे नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
वेळ व पैशांची बचत
आजरा येथे उपजिल्हा रूग्णालय होणार असल्याने ग्रामीण भागातील रूग्णांचा वेळ व पैसा या दोन्हींची बचत होणार आहे. सध्या गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात माफक दरात उपचार होत असले, तरी प्रवास, जेवण, राहणे याकरिता बराच खर्च करावा लागत असे.
अल्पदरात सुविधा
तज्ज्ञ डॉक्टरांकरवी अत्यल्प दरामध्ये विविध रोगांवर अत्यल्पदरात रूग्णांना सेवा मिळणार आहेत. इ.सी.जी., सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी, इत्यादी सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच स्त्रीरोग तज्ज्ञांची खास नेमणूक
होणार आहे.