Student revealed ghostly, dove trapped in kite rope rescued | विद्यार्थ्यांनी दाखविली भूतदया, पतंगाच्या दोरीत अडकलेल्या कबुतराची झाली सुटका
कोल्हापुरातील विकास हायस्कूलच्या आवारातील झाडावर पतंगाच्या दोरीत अडकलेल्या कबुतराच्या पिल्लाची महानगरपालिकेच्या जवानांनी सुटका केली. त्यांना शाळेमार्फत सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दाखविली भूतदया, पतंगाच्या दोरीत अडकलेल्या कबुतराची झाली सुटकाविकास विद्यामंदिरमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांचा केला सन्मान

कोल्हापूर : येथील विकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शाळेच्या आवारातील उंच झाडावर अडकलेल्या पतंगाच्या दोऱ्यात गुरफटलेल्या कबुतराच्या पिल्लाची सुटका केली.

विकास विद्यामंदिरातील शाळेच्या आवारात असलेल्या उंच झाडावर लटकलेल्या पतंगाच्या दोऱ्यात अन्नाच्या शोधातील कबुतराच्या पिल्लाचा पाय गुरफटल्याने त्याची अवस्था केविलवाणी झाली होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना या कबुतराच्या पिल्लाच्या सुटकेची धडपड लक्षात आली. हे पिल्लू या दोरीतून आपले पाय सोडविण्याची धडपड करीत होते.

विद्यार्र्थ्यानी आपल्या शिक्षकांचे लक्ष याकडे वेधले. त्यांनी या पिल्लाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला; पण झाड उंच असल्याने बरेच प्रयत्न करूनही त्याची सुटका करता आली नाही. शिक्षकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दूरध्वनी करून पाचारण केले.

माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ शाळेत दाखल झाले आणि दिवसभर अथक प्रयत्न करून उंच शिडीच्या साहाय्याने या कबुतराची सुटका केली. जखमी झालेल्या या कबुतराच्या पिल्लाला विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातच सावलीत ठेवले. जखमेवर हळद लावून त्याला पाणी पाजले. थोड्या वेळाने या कबुतराच्या पिल्लाने विद्यार्थ्यांनी दिलेला खाऊ खाऊन हळुवारपणे शाळेच्या गॅलरीच्या दिशेने झेप घेतली.

मुख्याध्यापिका के. जी. आवळे तसेच तानाजी कवडे, राजेंद्र जाधव, ए. एस. शिकलगार या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या या भूतदयेबद्दल त्यांचे कौतुक केले. कबुतराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे उदय शिंदे, युवराज लाड, सतीश यादव आणि संजय माने या जवानांनी तत्काळ घटनास्थळी येऊन कबुतराचा जीव वाचविल्याबद्दल या जवानांचा सन्मान शाळेमार्फत करण्यात आला.

 

 

Web Title: Student revealed ghostly, dove trapped in kite rope rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.