Kolhapur: बिथरलेल्या बिबट्याच्या बछड्याचा लोकांवर हल्ला, एकजण जखमी; ड्रोनद्वारे शोध मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:50 IST2025-10-10T16:49:13+5:302025-10-10T16:50:09+5:30
बचाव पथक ड्रोनद्वारे बछड्याचा शोध घेत आहे

Kolhapur: बिथरलेल्या बिबट्याच्या बछड्याचा लोकांवर हल्ला, एकजण जखमी; ड्रोनद्वारे शोध मोहीम
पन्हाळा : पन्हाळगडाच्या पायथ्याशी आपटी पैकी सोमावरपेठेत भरवस्तीत काल, गुरुवारी नर बिबट्याच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू झाला होता. हल्ल्यामुळे कुटुंबापासून विभक्त झाल्याने बिथरलेल्या बिबट्याच्या बछड्याने परिसरातील लोकांवर हल्ला केला. त्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. वन विभागाने ड्रोनद्वारे बछड्याची शोध मोहीम सुरु केली आहे.
याबाबत घटनास्थळ व वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, पन्हाळगडाच्या उत्तरेकडील पायथा परिसरात एक बिबट्या मादी, दोन बछड्याचा वावर होता. गावातील लोकांनी अनेकवेळा प्रत्यक्ष पाहिले होते. गुरुवारी आपटी पैकी सोमावरपेठेच्या भरवस्तीत एका बछड्याचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृत्यू नर बिबट्याच्या हल्ल्यात झालेचे निष्पन्न झाले होते.
वाचा : झुंजीत पन्हाळ्याच्या पायथ्याशी एका बिबट्याचा मृत्यू
या हल्ल्यामुळे कुटुंबापासून विखूरल्याने बिथरलेल्या बछड्याने परिसरात धुडगूस घातला आहे. गुरुवारी रात्री अजय आनंदा जाधव (वय २५ रा. बादेवाडी ) व विकास बाळू डावरे (४८ रा. जिऊर) यांच्यावर हल्ला केला. यामध्ये अजयच्या पायाला बिबट्याने ओरखडल्याने जखमी झाला. तर आज, शुक्रवारी सकाळी आपटी गावाचे हद्दीतील गणपती मंदिरा जवळ राम तानाजी गावडे (३० रा. जिऊर) व गीता रामराव गिरीगोसावी (४३ रा. आपटी) यांचा पाठलाग केला. तसेच दुपारी जयवंत गोविंद डावरे (६० रा. जिऊर) यांच्यावर हल्ला केला. बचाव पथक ड्रोनद्वारे बछड्याचा शोध घेत आहे.
परिक्षेत्र वनाधिकारी पन्हाळा अजित माळी यांचे उपस्थितीत सुरु असलेल्या या शोध मोहिमेत वन्यजीव बचाव पथक कोल्हापूर व पन्हाळा यांचे सह वनपाल सागर पटकारे, वनरक्षक संदिप पाटील, पोलिस पाटील रघुनाथ बुचडे सहभागी झाले होते.