Kolhapur: चंदुरात भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला, डालग्यात घुसून ३४ पिल्लांचा पाडला फडशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:48 IST2025-10-25T12:48:19+5:302025-10-25T12:48:38+5:30
बकऱ्यांचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

Kolhapur: चंदुरात भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला, डालग्यात घुसून ३४ पिल्लांचा पाडला फडशा
इचलकरंजी : चंदुर येथील आकमान मळा येथे भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांच्या ३४ पिल्लांना फाडले. त्यातील ३० पिल्ली मृत झाली असून ४ जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने पाहणी करून पंचनामा केला. बकरी मालक महादेव माय्यापा पुजारी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महादेव यांच्या बकऱ्यांची ४५ पिल्ली त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून चंदूर येथील महासिद्ध मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आकमान मळा येते लोखंडी डालग्यात बसवली होती. शुक्रवारी रात्री भटक्या कुत्र्यांनी याठिकाणी हल्ला केला. लोखंडी डालग्याच्या फटीतून अथवा डालग्याला सकल भागाकडे ओढून कुत्र्यांनी हा हल्ला केला असण्याची प्राथमिक शक्यता वन विभागाने वर्तवली आहे.
डालग्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांनाही कुत्र्यांनी फाडले आहे. तसेच डालग्यात घुसून आतील पिल्लांचाही फडशा पडला. त्यामुळे शेतात ठिकठिकाणी पिल्ली मृत अवस्थेत पडलेली आढळली. बकऱ्यांचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
ही माहिती समजतात वन विभागाचे वनपाल संजय कांबळे, वन रक्षक मंगेश वंजारे, पशु वैध्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर, तलाठी राजू माळी, पोलीस पाटील राहुल वाघमोडे, कोतवाल राजू पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी हातकणंगले पं.स. माजी सभापती महेश पाटील, यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी आदी उपस्थित होते.