Kolhapur: कागदपत्रांचा गैरवापर: ‘त्या’ शोरूमला दुचाकी विक्री बंद करण्याचे आदेश

By उद्धव गोडसे | Updated: December 13, 2024 15:57 IST2024-12-13T15:56:35+5:302024-12-13T15:57:09+5:30

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची कारवाई; इतरही गैरप्रकारांची चर्चा

Stop selling orders to those showrooms in Kolhapur which are selling cars through old customer documents | Kolhapur: कागदपत्रांचा गैरवापर: ‘त्या’ शोरूमला दुचाकी विक्री बंद करण्याचे आदेश

Kolhapur: कागदपत्रांचा गैरवापर: ‘त्या’ शोरूमला दुचाकी विक्री बंद करण्याचे आदेश

उद्धव गोडसे

कोल्हापूर : ग्राहकांच्या जुन्या कागदपत्रांच्या आधारे जिल्ह्यात विक्री केल्याचे दाखवलेल्या दुचाकी परदेशात पाठवल्याच्या तक्रारी येताच प्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी ताराराणी चौकातील ‘त्या’ शोरूमला नोटीस पाठवली असून, तातडीने दुचाकींची विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या शोरूममधील इतरही गैरप्रकारांची चर्चा सुरू झाली आहे.

दुचाकी विक्रीत दबदबा असलेल्या ताराराणी चौकातील शोरूममधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जुन्या ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून ३५ दुचाकी देशाबाहेर पाठवल्याचा प्रकार समोर येताच वाहन विक्री क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कागदपत्रांचा गैरवापर झालेल्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ते पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याच्या तयारीत आहेत. शोरूमने अशी फसवणूक का केली? असा जाब विचारण्याचीही तयारी त्यांच्याकडून सुरू आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित शोरूमला नोटीस पाठवली. पुढील सूचनेपर्यंत त्यांना दुचाकींची विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शोरूमच्या कागदपत्रांची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.

लोकमतच्या वृत्ताने खळबळ

जिल्ह्यातील नागरिकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून झालेल्या दुचाकी विक्रीचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणताच या वृत्ताने राज्यभर खळबळ उडाली. फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आणल्याबद्दल विविध क्षेत्रातील जाणकारांनी कौतुक केले. तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्याची गरज व्यक्त केली.

कामगार कायद्याचे उल्लंघन

या शोरूममध्ये सुमारे ७० कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अनेकांना कामगार कायद्याचा लाभ मिळत नाही. प्रशासनाने त्यांच्या नियुक्तीत जाणीवपूर्वक अनेक त्रुटी ठेवल्या. कामगार कार्यालयाकडे काही कामगारांची नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे शासकीय सुविधांपासून कामगार वंचित आहेत. तसेच कामगारांची पिळवणूक होत असल्याच्याही तक्रारी आहेत.

जीएसटीच्या नोटिसा

वाहन विक्रीत त्रुटी ठेवल्याबद्दल जीएसटी विभागानेही या शोरूमला नोटिसा पाठवल्या आहेत. त्यावरील सुनावण्या सातत्याने सुरू असतात. गेल्या चार-पाच वर्षात शोरूमला वाहननिर्मिती कंपनीकडून मिळालेल्या दुचाकी आणि प्रत्यक्ष जिल्ह्यात विक्री झालेल्या दुचाकींचा ताळमेळ घातल्यास शोरूमचा कारभार चव्हाट्यावर येऊ शकतो.

विक्री बंद; चौकशी सुरू

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दुचाकी विक्री बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही गुरुवारी हे शोरूम सुरू होते. प्रत्यक्ष वाहनांची विक्री बंद असली तरी, चौकशीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दुचाकींची माहिती दिली जात होती. मात्र, कर्मचारी प्रचंड तणावात दिसत होते. शोरूममध्ये नेहमीप्रमाणे वर्दळही नव्हती.

विक्री झालेल्या दुचाकी पुढे कुठे गेल्या याचा तपास करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी येताच आम्ही संबंधित शोरूमला नोटीस पाठवून विक्री थांबविण्याचा आदेश दिला आहे. चौकशीनंतर पुढील कार्यवाही होईल. गरज पडल्यास शोरूमच्या विरोधात गुन्हाही दाखल करू. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Stop selling orders to those showrooms in Kolhapur which are selling cars through old customer documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.