लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : निपाणी शहर व परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. असे असले तरी याची अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडे नाही. सामान्य रुग्णांची उपचाराअभावी मोठी गैरसोय होत आहे. याची दखल घेऊन निपाणीत नगरपालिकेतर्फे १०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी केली आहे.
गाडीवड्डर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निपाणी शहर व उपनगरात कोरोना रुग्णांवर उपचार करताना शासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. यातच खासगी रुग्णालयात उपचार घेताना येणारा खर्च सामान्य नागरिकांना परवडत नाही. अशावेळी नगरपालिकेतर्फे कोरोना रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन कोरोना केअर सेंटर सुरू करणे गरजेचे आहे.
राज्य सरकारने कोरोना नियंत्रणासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्यास मुभा दिली आहे. तसेच एसएफसी निधीतूनही कोरोना नियंत्रणासाठी खर्च करता येतो. हे लक्षात घेऊन नगरपालिकेतर्फे या निधीतून म्युनिसिपल हायस्कूलमध्ये १०० बेडचे मोफत कोविड केअर सेंटर करणे शक्य आहे. आता शहरवासीयांचे आरोग्य जपणे गरजेचे असून याकडे लक्ष देऊन तातडीने कोरोना केअर सेंटर उभारावे.