A speeding two-wheeler hit a car, eventually killing the young man | वेगवान दुचाकीची कारला धडक, जखमी तरुणाचा अखेर मृत्यू
वेगवान दुचाकीची कारला धडक, जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

ठळक मुद्देवेगवान दुचाकीची कारला धडकशिवाजी पेठेतील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कॅँटीन रस्त्यावर भरधाव मोटारसायकलची समोरच्या कारला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या तरुणाचा शुक्रवारी पहाटे उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

संकेत बाजीराव पाटील (वय २०, रा. शिवाजी पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याचा मित्र मंदार मधुसूदन पाटील (वय १९, रा. नागाळा पार्क कमानीजवळ ) याचाही अपघातामध्ये मृत्यू झाला. वेगाच्या नशेत दोघा महाविद्यालयीन तरुणांचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंदार पाटील व संकेत पाटील दोघेजण आर. के.नगर परिसरातील भारती विद्यापीठात दुसºया वर्षात शिकत होते. गुरुवारी (दि. ७) सायंकाळी चारच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून कोल्हापुरात येत असताना शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कॅँटीन रस्त्यावर शासकीय तंत्रनिकेतनपासून पुढे येताच मोटारसायकलवरील ताबा सुटून समोरच्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली.

त्यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दूखापत झाली होती. उपचार सुरु असताना काही तासातच मंदारचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे संकेतचा मृत्यू झाला. पाठोपाठ दोघांचाही मृत्यू झाल्याने नागाळा पार्क आणि शिवाजी पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
 

 

Web Title: A speeding two-wheeler hit a car, eventually killing the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.