कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी दक्षिण, करवीर आमदारांनी भूमिका जाहीर करावी, सर्व पक्षीय कृती समितीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:00 IST2025-01-30T11:58:51+5:302025-01-30T12:00:09+5:30
मुश्रीफ यांच्या घरालाही घेराव घालू

कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात बुधवारी आयोजित सर्व पक्षीय कृती समितीच्या बैठकीत हद्दवाढप्रश्नी ॲड. बाबा इंदूलकर यांनी मार्गदर्शन केले
कोल्हापूर : शहर हद्दवाढप्रश्नी येत्या चार दिवसांत दोन खासदार, शहर, करवीर, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी भूमिका जाहीर करावी. हद्दवाढीला पाठिंब्याची पत्रे द्यावीत, अन्यथा या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा इशारा बुधवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला.
हद्दवाढीला काही लोकप्रतिनिधी विरोध करीत असल्याचे नुकतेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. यामुळे मुश्रीफ यांनी हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, अन्यथा त्यांच्याच घराला पहिल्यांदाच घेराव घालू असेही जाहीर करण्यात आले.
माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे १९७२ पासून शहराची हद्दवाढ झालेली नाही. आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न केले. विरोध करणाऱ्या कळंबा गावात ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी गेलो. पण तेथे आक्रमक ग्रामस्थांच्या तावडीतून कपडे वाचवून सुटका करून घेण्याची वेळ आली. आम्हाला चर्चेला पाठवायचे आणि आमच्या अंगावर ग्रामस्थ सोडायचे असे काही नेते करीत आहेत. त्यामुळे आता शासनाने ठोस भूमिका घेऊन हद्दवाढ केली पाहिजे. राज्यातील अनेक शहरांची हद्दवाढ झाली. पण कोल्हापूरला वारंवार मागूनही हद्दवाढ मिळत नसल्याचे नैराश्य आले आहे. हद्दवाढीसाठी प्रसंगी मी आत्मदहनही करण्यास तयार आहे. हद्दवाढीसाठी टप्याटप्याने आंदोलन व्यापक केले जाईल.
ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, गेल्या ५३ वर्षांपासून शहराची हद् ६६.८२ चौरस किलोमीटर इतकीच आहे. हद्दवाढ न होण्याला सर्व पक्षाचे लोकप्रतिनधी, पदाधिकारी दोषी आहेत. यामुळे करवीर, दक्षिण, उत्तर या आमदारांनी शहर हद्दवाढ झालीच पाहिजे, असे पत्र द्यावे. ते पत्र घेऊन शासनास हद्दवाढ करण्यास भाग पाडावे.
भाजपचे महेश जाधव म्हणाले, महापालिकेच्या सुविधा घ्यायच्या आणि विरोध करायचे, अशी भूमिका चालणार नाही. टोलचा लढा ज्याप्रमाणे यशस्वी केला त्याप्रमाणे हद्दवाढीसाठीचेही आंदोलन व्यापक करू. सुजित चव्हाण म्हणाले, हद्दवाढीसाठी आर या पारचे आंदोलन शिवाजीपेठेतून सुरू करू. प्रसंगी लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी पाच हजारांचा जमाव घेऊन जाऊ.
दिलीप देसाई यांनी हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक होऊ नये, अशी मागणी केली. चंद्रकांत यादव, रविकिरण इंगवले, बाबा पार्टे, सुभाष देसाई, किशोर घाटगे, अनिल घाटगे, संपत चव्हाण, भरत काळे, प्रसाद पाटील, दिलीप पवार यांची भाषणे झाली. बैठकीस विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
माझ्या ‘बा’ने प्रयत्न केलेत..
ॲड. बाबा इंदूलकर यांनी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना समजावण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप केला. याला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आक्षेप घेतला. माझ्या ‘बा’ ने प्रयत्न केले आहेत. माहिती घेऊन बोला असा दम दिला. शेवटी हद्दवाढीसाठी तुम्ही मला पायतले काढून मारले तरी चालेल पण हद्दवाढ झाली पाहिजे, असे म्हणत इंदूलकर यांनी वादावर पडदा टाकला.
हद्दवाढीसाठी एकोपा महत्त्वाचा..
हद्दवाढीसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एकोपा ठेवावा. प्रस्तावित हद्दवाढीतील ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करावेत. हद्दवाढ झाल्यानंतर जमिनी बळकावणार नाही, आरक्षण टाकणार नाही असा शब्द महापालिकेने द्यावा, असे रविकिरण इंगवले यांनी सुचविले.