कृषी विभागानेच शेतीची केली माती; कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजारांवर माती परीक्षण अहवाल कपाटात पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:40 IST2024-12-25T17:40:22+5:302024-12-25T17:40:59+5:30

अहवालच आला नसेल तर शेतकरी करणार काय?

Soil test reports were not received on 10 thousand in Kolhapur district | कृषी विभागानेच शेतीची केली माती; कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजारांवर माती परीक्षण अहवाल कपाटात पडून

कृषी विभागानेच शेतीची केली माती; कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजारांवर माती परीक्षण अहवाल कपाटात पडून

आयुब मुल्ला

खोची : जिल्ह्यातील शेतीचे आरोग्य तपासणीचे काम करणारी यंत्रणा संथ गतीने सवडीने वाटचाल करीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी तपासणीसाठी जिल्ह्यातून घेतलेले १० हजार २०० नमुने अद्याप जैसे थे आहेत. मातीच्या नमुन्यांचे काय झाले, असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत. खरीप संपला, रब्बी संपत आला तरी मातीचा पोत सक्षम आहे की खराब आहे हे सांगण्यास कृषी विभाग पुढे आलेला नाही. त्यामुळे कृषी विभागाची कार्यक्षमताच तपासण्याची वेळ आली आहे.

भरघोस उत्पादनाचा मंत्र कळणात तरी कसा..

  • वापरा माती परिक्षणाचे तंत्र असे म्हणत शेतकऱ्यांमध्ये जागृती करणारा माती परीक्षण विभाग कृतीमध्ये मात्र गतिमान झालेला नाही. अलीकडच्या काळात जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी रासायनिक खतांचा अतिरिक्त असंतुलित वापर केला जातो. पाण्याचा अयोग्य वापरसुद्धा होताना दिसतो. 
  • जमिनी सतत पिकाखाली राहिल्यामुळे सुपीकता कमी होऊन उत्पादन घटू लागले आहे. अशावेळी जमिनीचे आरोग्य कसे आहे, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याचे मार्गदर्शन माती माती परीक्षण अहवालातून मिळते. यासाठी माती परीक्षणाची मोहीम कृषी विभागाने हाती घेतली होती. 
  • राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मे महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावांची निवड केली. त्या गावातील प्रत्येकी ८५ शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचे नमुने तपासणीसाठी संकलित केले. त्यानुसार एका तालुक्यातील ८५० या प्रमाणे एकूण १० हजार २०० नमुने संकलित झाले. 
  • जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदचाचणी येथील प्रयोग शाळेत त्याची तपासणी सुरू झाली. परंतु अजून तपासणीचे काम निम्म्यापर्यंत आले आहे. हीच स्थिती राहिली तर संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी सव्वा वर्षाचा कालावधी लागू शकतो. सात महिने झाले तरी मातीचे आरोग्य कळणार नसेल तर शेतकऱ्यांनी शेती करायची तरी कशी, हाच खरा प्रश्न आहे.


विभागात रोज चौघेच कामावर

शेतकरी स्वतःहून माती परीक्षणासाठी आले तर त्यांना साधी तपासणी हवी असेल तर ३५ रुपये व सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणीसाठी २०० रुपये फी घेऊन दोन आठवड्यात तपासणी करून दिली जाते. मुळातच या विभागात एक अधिकारी, एक सुपरवायझर व चार कृषी सहायक यांची नेमणूक आहे. परंतु रजा व अन्य कारणाने बहुधा चौघेच काम पाहतात. त्यामुळे तपासणी गतीने करणे जिकिरीचे झाले आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करून हा विभाग अधिक सतर्क करणे गरजेचे आहे.

सेंद्रिय कर्ब सुधारण्याची गरज

सेंद्रिय कर्बमुळे जमिनीचा पोत सुधारतो. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी या तालुक्यातील मातीमध्ये ०.६१ ते १.०० टक्के म्हणजे भरपूर तर उर्वरित गगनबावडा, गडहिंग्लज, हातकणंगले, कागल, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यात ०.४१ ते ०.६० टक्के म्हणजे सेंद्रिय कर्बाची पातळी मध्यम आहे.


शेतकरी विविध प्रकारे प्रयोगशील शेती करीत आहे. मातीचे आरोग्य समजले तर सुपीकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे सोपे होते. त्यामुळे कृषी विभागाने माती परीक्षण करून तात्काळ त्याची माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. - संजय चोपडे, शेतकरी, लाटवडे

Web Title: Soil test reports were not received on 10 thousand in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.