कोल्हापुरातून १८९ कोटींच्या सॉफ्टवेअरची निर्यात, लोकप्रतिनिधींनी आयटी पार्कसाठी जोर लावण्याची गरज
By समीर देशपांडे | Updated: December 28, 2024 13:10 IST2024-12-28T12:29:18+5:302024-12-28T13:10:51+5:30
अजित पवार यांची सूचना पण..

कोल्हापुरातून १८९ कोटींच्या सॉफ्टवेअरची निर्यात, लोकप्रतिनिधींनी आयटी पार्कसाठी जोर लावण्याची गरज
समीर देशपांडे
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या एका बाजूला असणाऱ्या, रांगड्या परंतु देशभरात दरडोई उत्पन्नात अग्रगण्य असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आयटी उद्योगानेही बाळसे धरले आहे. सन २०२३-२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून १८९ कोटी रुपयांच्या सॉफ्टवेअरची निर्यात झाली आहे. या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ एकीकडे देश-विदेशात सेवा देत असताना कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी मंत्री, खासदार, आमदारांनी आता जोर लावण्याची गरज आहे.
कोल्हापूरच्या आयटी क्षेत्रासाठी असलेली ही निर्यातवृद्धीची सुखद वार्ता थेट लोकसभेत देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातून २०१९-२० मध्ये १२८ कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात झाली होती. त्यामध्ये ५० टक्के वाढ होऊन सन २०२३-२४ मध्ये ती १८९ कोटींवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात पुणे आयटीमध्ये अव्वल असून, त्यानंतर नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरेही आयटी नकाशावर ठळकपणे पुढे येत आहेत.
गेली १२ वर्षे कोल्हापूरच्या आयटी पार्कबाबत नेतेमंडळींकडून घोषणा होत आहेत. परंतु, यातील प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील किमान ५० हजाराहून अधिक युवक-युवती याच क्षेत्रात पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबादसह अन्य शहरांमध्ये नोकरीस आहेत. जर का आयटी कंपन्या कोल्हापूरमध्येच आल्या तर निश्चित स्थानिकांना याच ठिकाणी रोजगार मिळणार असून, यातून कोल्हापूरच्या अर्थकारणालाही आणखी पाठबळ मिळणार आहे.
अजित पवार यांची सूचना पण..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जागा हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या बदल्यात कृषी विद्यापीठाला शहराजवळ ५० हेक्टर जागा द्यावी, अशीही सूचना करण्यात आली होती. यानंतर महसूल विभागाने कृषी विभागाला पर्यायी जागा दाखवल्या. परंतु, त्या गैरसोयीच्या असल्याने कृषी विद्यापीठाने या जागेचे हस्तांतरण करण्यास मान्यता दिलेली नाही.
गेली १२ वर्षे कोल्हापूरमध्ये आयटी पार्क व्हावे, यासाठी आयटी असोसिएशन प्रयत्नशील आहे. सुरुवातीला टेंबलाई येथील जागा पार्कसाठी देणार, असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर शेंडा पार्कमधील जागा देण्याची घोषणा करण्यात आली. कोल्हापूर परिसरात ३५० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. परंतु, शासनाचे पाठबळ नसल्यामुळे कोल्हापूरला आयटी पार्क उभारण्यावर मर्यादा येत आहेत.- शांताराम सुर्वे अध्यक्ष, आयटी असोसिएशन, कोल्हापूर
सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही क्षेत्रांत कोल्हापूरमधील अनेक युवक-युवती देश-विदेशात कार्यरत आहेत आणि आयआयटीमध्ये शिक्षणही घेत आहेत. पण कोल्हापूरमध्ये संधी नसल्याने सर्वजण बाहेर कार्यरत आहेत. कोल्हापूरमध्ये जर आयटी हब झाले तर फक्त कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचाही विकास होणार आहे. स्थानिक व देशातील तंत्रज्ञांना संधीही मिळेल आणि पुणे, बंगळुरूसारख्या शहरांवरचा ताणही कमी होईल. समतोल विकासासाठी कोल्हापूरला आयटी हब होणे ही काळाची गरज आहे. - रविकिरण केसरकर, आरएमजी इंडिया हेड, एटॉस इविडेन