Kolhapur News: दारू तस्करांनी नवीन फंडे वापरले; कारवाईच्या सापळ्यात अडकले
By उद्धव गोडसे | Updated: January 21, 2026 18:33 IST2026-01-21T18:33:12+5:302026-01-21T18:33:36+5:30
निवडणुकांच्या काळात वाढली तस्करी, अडीच महिन्यांत दीड कोटीची दारू पकडली, ५८५ गुन्हे

Kolhapur News: दारू तस्करांनी नवीन फंडे वापरले; कारवाईच्या सापळ्यात अडकले
उद्धव गोडसे
कोल्हापूर : निवडणुकांच्या काळात गेल्या अडीच महिन्यांत तस्करांनी नवनवे फंडे वापरून दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी सुमारे दीड कोटीची दारू आणि पावणेदोन कोटींची वाहने पकडून तस्करांचे मनसुबे उधळून लावले.
कमी किमतीत मिळणारी गोवा बनावटी दारू छुप्या मार्गाने आणून ती जिल्ह्यात विकण्याचे प्रकार यापूर्वी सुरू होते. नगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच सुरू झालेल्या आचारसंहिता काळात तस्करांनी नवे फंडे वापरण्यास सुरुवात केली. गोव्यात तयार होणाऱ्या दारूला महाराष्ट्रातील प्रसिद्ध ब्रँडचे लेबल लावले.
तपासणी नाक्यांवर सापडू नये, यासाठी ट्रकमध्ये बाहेरच्या बाजूला पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स ठेवून त्यामागे दारूच्या बाटल्यांचे बॉक्स लपवून आणले. तस्करीचे नवीन फंडे वापरून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा प्रयत्न तस्करांनी केला. तरीही, पथकांनी ४ नोव्हेंबर २०२५ पासून जिल्ह्यात तब्बल दीड कोटी रुपयांची २८ हजार लिटर दारू पकडली.
२८ हजार लिटर दारू जप्त
- देशी - १२ हजार ४१८
- गावठी - ११ हजार ६४८
- विदेशी - २५०
- परराज्यातील - दोन हजार ४५२
- ताडी - एक हजार ११३७
- मद्यार्क - १८५
कर्नाटकमार्गे नागपूरला रवाना
गोव्यातून आणली जाणारी दारू देवगडमार्गे कोकणातून कोल्हापूर जिल्ह्यात येते. निपाणी मार्गावरून ती कर्नाटकातून पुढे नागपूरला जाते, अशी माहिती रविवारी (दि. १८) अटक केलेल्या तस्करांच्या चौकशीतून समोर आली. त्यांनी यापूर्वी चारवेळा सुमारे पावणेदोन कोटींची देशी दारू नागपूरला पोहोचवल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.
८९ वाहने, ५८५ गुन्हे
गेल्या अडीच महिन्यांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू तस्करीतील सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची ८९ वाहने पकडली. एकूण ५८५ गुन्हे दाखल केले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत या कारवाया आणखी गतिमान होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सीमा तपासणी नाके काय करतात ?
कोकण आणि कर्नाटकातून येणाऱ्या सर्व मार्गांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सीमा तपासणी नाके आहेत. नाक्यांवर २४ तास वाहनांची तपासणी केली जाते. तरीही, एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू घेऊन वाहने जिल्ह्यात दाखल होतात. त्यामुळे सीमा तपासणी नाक्यांवरील अधिकारी आणि कर्मचारी काय करतात?, असा सवाल उपस्थित होतो.
निवडणूक काळात दारूची तस्करी रोखण्यासाठी सर्व भरारी पथके पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. तस्करांनी नवीन फंडे वापरले, तरी त्यांना पकडण्यात पथकांना यश आले. यापुढेही कारवायांमध्ये सातत्य राहील. - स्नेहलता नरवणे - अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर