कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस, कोकणात जाणारी वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:55 IST2019-07-30T11:50:31+5:302019-07-30T11:55:25+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासूनच धुवांधार पाऊस कोसळत आहे. कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग बंद झाला असून वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार इतर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस, कोकणात जाणारी वाहतूक बंद
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासूनच धुवांधार पाऊस कोसळत आहे. कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग बंद झाला असून वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार इतर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज आदी तालुक्यात अतिवृष्टी कायम असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. राधानगरीतून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. विविध नद्यांवरील ४0 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिरोळ तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाढले आहे. कुरुंदवाड-जयसिंगपूर रस्ता सकाळी ७.४५ वाजता झार पडल्याने बंद आहे.
शनिवारी (दि. २७), रविवारी (दि. २८) कोल्हापुरात पावसाचा जोर काहिसा कमी होता; पण सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला. दिवसभर एकसारखी संततधार सुरु असून धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ८६ टक्के, तर वारणा ७६ टक्के भरले आहे.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर १.५ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कळे मार्गे गगनबावड्याकडे जाणारी वाहतूक, तसेच कोल्हापूर कडून जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. याशिवाय वैभववाडीकडून कोल्हापूरकडे येणारी वाहतूकही गगनबावडा येथे थांबविण्यात आली आहे. टेकवाडी (ता. गगनबावडा) येथील रस्त्यावर पाणी आल्याने गावाची पूर्णत: वाहतूक बंद आहे. दुसऱ्यांदा हे गाव संपर्काबाहेर गेले आहे.
पन्हाळा तालुक्यातही पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. केर्ली येथे कासारी नदीचे पाणी रस्त्यावर आले असून पाण्याची पातळी वाढलेली आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.
कुंभी नदीवरील गोठे-परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बाजार भोगाव तसेच पोहाळे तर्फ बोरगाव याच्या मध्यभागी कासारी नदीच्या बाजूला अंदाजे तीन फूट पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद आहे मात्र, पोहाळवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.
चंदगड तालुक्यातही पावसामुळे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळी ६.३0 वाजता घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डे, आडकूर, कानडेवाडी, तारेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तालुक्यातील ताम्रपर्णी नदीवरील कुरतनवाडी, हल्लारवाडी हे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी मार्ग बंद असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या चंदगड आगाराची चंदगड-हेरे, चंदगड-गवसे, चंदगड -भोगोली, चंदगड- मानगांव, चंदगड- कोनेवाडी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
राधानगरीतून पाण्याच्या विसर्गात वाढ
राधानगरीतून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे पुलावर पाणी आले आहे, तसेच शेणगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. याबाबत पुर नियंत्रण कक्षास कळविण्यात आले आहे. किटवाड नंबर २ लघु पाटबंधारे तलाव सकाळी ७ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.
कोल्हापूर शहरात पाणीच पाणी
कोल्हापूर शहरातही जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. राजाराम बंधाºयाची पाणी पातळी ३२ फुट ९ इंच इतकी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी गुढघाभर पाणी साचले आहे. यामुळे बहुतेकांनी चारचाकी वाहने बाहेर काढली आहेत, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाणीच पाणी झाले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूकीची कोंडी झाली आहे. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते उखडले असून पादचारी आणि दुचाकी चालकांना कसरत करावी लागत आहे. पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, तर काही शाळांना सुटीच देण्यात आली आहे.
कळंबा तलाव भरला, मासेमारी जोरात
कळंबा तलाव पाण्याचा विसर्ग वाढला असून सांडव्या वरून एक फुटाने पाणी बाहेर पडू लागले आहे. सांडव्यावरून मोठे मासे बाहेर पडू लागल्याने पर्यटकांची मासेमारी जोरात सुरु आहे.
अलमट्टी धरण ९५ टक्के भरले
अलमट्टी धरण मंगळवारी ९५ टक्के (११७ टी.एम.सी) भरले असून अलमट्टी धरणामध्ये होनारी आवक ७६000 क्यूसेक व अलमट्टी धरण मधून विसर्ग १0१000 क्यूसेक इतका आहे. कृष्णा नदीमधून होणारा विसर्ग वाढल्यास पुढील विसर्ग वाढविणार आहेत असे अलमट्टी प्रशासन यांनी कळविले आहे.,