तपोवनजवळील ११ झोपड्या तोडल्या, महापालिकेची कारवाई : अनधिकृत बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:40 IST2019-10-09T17:37:52+5:302019-10-09T17:40:38+5:30
कळंबा रस्त्यावरील तपोवन मैदानाला लागून अनधिकृत बांधकाम झालेल्या ११ झोपडीवजा घरे बुधवारी महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोकलॅँडच्या साहाय्याने तोडली. यावेळी एका कुटुंबातील काही व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. या वादावादीत एक व्यक्ती बेशुद्ध पडली. त्यास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

कोल्हापुरातील तपोवन मैदानाजवळील अनधिकृत झोपडीवजा घरे बुधवारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम घेऊन जमीनदोस्त केली. कारवाईपूर्वी घरातील साहित्य कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले. (छाया : अमर कांबळे)
कोल्हापूर : कळंबा रस्त्यावरील तपोवन मैदानाला लागून अनधिकृत बांधकाम झालेल्या ११ झोपडीवजा घरे बुधवारी महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोकलॅँडच्या साहाय्याने तोडली. यावेळी एका कुटुंबातील काही व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.
तपोवन मैदानाला लागून रस्त्याकडेला काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करून ६० कुटुंबांनी आपली झोपडीवजा घरे उभारली होती. चार वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने या सर्वांना साळोखेनगर परिसरात एक गृहप्रकल्प उभा करून ६० कुटुंबांना घरे बांधून दिली, जवळपास ४९ कुटुंबांनी अनधिकृत झोपडीवजा घरे पाडून टाकून नवीन गृहप्रकल्पात स्थलांतर केले. ११ कुटुंबांनी मात्र आपली घरे तशीच ठेवली होती. इकडे नवीन घराचा ताबा घेऊनही जुनी घरे पाडली नव्हती.
बुधवारी सकाळी विभागीय कार्यालय, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथक यांनी एकत्रितपणे कारवाई करून ही घरे पाडली. कारवाईवेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार उपस्थित होते.