कोल्हापूरची श्रेया घालणार विश्व विक्रमाला गवसणी! दांडपट्ट्याने कापणार १२०० लिंबू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 19:17 IST2023-03-24T19:16:38+5:302023-03-24T19:17:03+5:30
गेली तीन वर्ष करत आहे सराव

कोल्हापूरची श्रेया घालणार विश्व विक्रमाला गवसणी! दांडपट्ट्याने कापणार १२०० लिंबू
रमेश वारके
बोरवडे : कागल तालुक्यातील बोरवडे येथील १३ वर्षाची श्रेया साठे ही जागतिक विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे. येत्या रविवारी (दि. २६) मुंबईमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत वीस मिनिटांमध्ये दांडपट्ट्याने बाराशे लिंबू कापणार आहे. याची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड (आय.इ ए.) मध्ये घेतली जाणार आहे.
श्रेया युवराज साठे हिने बोरवडेतीलच मार्शल आर्ट दांडपट्टा मंडळाचे वस्ताद विष्णू मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्ष दांडपट्ट्याने लिंबू कापण्याचा सराव करून जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगले. ९ मार्चला बोरवडेच्या आझाद मैदानावरती श्रेयाने १९ मि २८ सेकंदात १२०० लिंबू दांडपट्ट्याने कापून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी गावचे सरपंच जयश्री फराकटे, मुरगुडचे एम.डी. रावण, वस्ताद विष्णू मगदूम, सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे, डॉ. महादेव साठे, श्रेयाचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थितीत होते.
साठे कुटुंबिय शेतकरी असून त्यांना हा खर्च परवडणारा नव्हता. जवळपास ६० ते ७० हजार रुपये यासाठी खर्च येणार आहे. श्रेयाची जिद्द पाहून सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे यांनी तिचे पालकत्व स्वीकारले. तिला येणारा खर्च संभाजी फराकटे यांनी उचलला असून तिच्या अन्य खर्चासाठी लोकवर्गणीतून निधी जमा केला आहे. श्रेया येत्या रविवारी मुंबईत दांडपट्ट्याने १२०० लिंबू कापून विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे.