Kolhapur: जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेस सुरुवात, भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:16 IST2025-07-31T16:16:06+5:302025-07-31T16:16:47+5:30
आज, गुरुवारी धुपारती सोहळ्याने होणार सांगता

Kolhapur: जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेस सुरुवात, भाविकांची गर्दी
जोतिबा : क्षेत्र जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेस प्रारंभ झाला असून, हजारो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. आज, गुरुवारी सकाळी ६ वाजता धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सुरक्षितेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.
भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासकीय यंत्रणा व स्थानिक ग्रामस्थ पुजारी सज्ज झाले आहेत. बुधवारी रात्रभर भाविक जोतिबा डोंगरावर येतच राहिले. चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला. षष्ठी यात्रेची वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रात्रभर भरते. भाविक उपवास करून येतात आणि दुसऱ्या दिवशी पुजाऱ्याच्या घरी सोडतात.
जोतिबा मंदिरात धुपारती धार्मिक विधी कार्य झाले. चोपडाई देवीची उत्सव महापूजा बांधण्यात आली. मुंबई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर भागातून लाखोंच्या संख्येने भाविक यात्रेला आले होते. जोतिबा डोंगर रात्रभर जागा होता. भाविकांनी पुजाऱ्यांच्या घरांत असरा घेतला. पुजाऱ्यांच्या घरी महिलांची रात्रभर पुरणपोळी करण्याची लगबग सुरू होती. सलग तीन वर्ष श्रावण षष्ठी केल्यावर श्री.चोपडाई देवीला साडी चोळी देऊन अभिषेक करून षष्ठी उजविण्याचा धार्मिक विधी पुजाऱ्यांमार्फत केला जातो. नारळयुक्त लिंबू असलेला राखणीचा नारळ प्रसाद म्हणून घरी नेतात.
जोतिबा मंदिरात रात्रभर सुरू असणारी धुपारती बुधवारी सकाळी ६ वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी उंट-घोडे वाजंत्री देव सेवक श्रीचे पुजारी या लवाजम्यासह बाहेर पडेल. गुलाल खोबऱ्यांची उधळण करून भाविक पुजाऱ्यांच्या घरी पुरणपोळी नेवैद्य व नारळमुक्त लिंबूचा राखणीचा नारळ घेऊन परतीच्या मार्गाला लागतील.
दरम्यान, यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडी, धैर्यशील तिवले, कोडोली पोलिस निरीक्षक कैलास कोडग, ग्रामपंचायत प्रशासक अभिजित गावडे, ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल भोगण तळ ठोकून होते.