The shops will remain closed till the state decides | राज्याचा निर्णय होईपर्यंत दुकाने बंदच

राज्याचा निर्णय होईपर्यंत दुकाने बंदच

ठळक मुद्देराज्याचा निर्णय होईपर्यंत दुकाने बंदच जिल्हाधिकारी दौलत देसाई : व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन

कोल्हापूर : दुकाने सुरू करण्यासंबंधात व्यापाऱ्यांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. हा विषय राज्यस्तरीय असून दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत व्यावसायिकांनी बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. आज शुक्रवारी काही निर्णय न झाल्यास याबाबत सोमवारीच काही निर्णय अपेक्षित आहे. शनिवार-रविवारी वीकेंन्ड लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत.

ब्रेक द चेनअंतर्गत राज्य शासनाने सरसकट सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला व्यावसायिकांनी तीव्र निषेध केला असून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. राज्यभरातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तसेच संलग्न संस्थांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, सकारात्मक निर्णय घेऊ, दोन दिवसांचा वेळ द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दुपारी व्यावसायिकांशी व्हीसीद्वारे संवाद साधला.

यावेळी व्यावसायिकांनी गुढीपाडवा जवळ आला आहे. आधीच वर्षभर कोरोनामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यात आता पुन्हा लॉकडाऊन झेपण्यासारखे नाही. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळू; पण व्यवसायाची परवानगी द्या, अशी मागणी केली.

त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय राज्य पातळीवर घेतला जाणार असल्याने मुख्यमंत्र्यांचा निर्णय होईपर्यंत थांबा, त्यांनी दिलेल्या शब्दाचा मान राखा, असे आवाहन केले. या चर्चेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष सयाजी झुंजार, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, ज्येष्ठ व्यापारी प्रदीपभाई कापडिया, हॉटेल कामगार संघटनेचे गिरीश फोंडे यांनी सहभाग घेतला.

नियमावली शासनाला सादर

व्यवसाय सुरू करताना कोणकोणते नियम पाळले पाहिजेत, यावर राज्य शासनाने व्यावसायिकांकडे मार्गदर्शक नियमावली मागितली आहे. ही नियमावली राज्य संघटनेने सादर केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title: The shops will remain closed till the state decides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.