कोल्हापूर चित्रपटसृष्टी ऑन फ्लोअर, वेबसिरीज, रिॲलिटी शोचे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 02:40 AM2021-01-16T02:40:27+5:302021-01-16T02:40:52+5:30

कोरोनाचे संकट ठरले इष्टापत्ती : मालिका, वेबसिरीज, रिॲलिटी शोचे शूटिंग

Shooting of Kolhapur Films on Floor, webseries, reality shows | कोल्हापूर चित्रपटसृष्टी ऑन फ्लोअर, वेबसिरीज, रिॲलिटी शोचे शूटिंग

कोल्हापूर चित्रपटसृष्टी ऑन फ्लोअर, वेबसिरीज, रिॲलिटी शोचे शूटिंग

googlenewsNext

इंदुमती गणेश/
प्रगती जाधव-पाटील

कोल्हापूर : कोरोनाचे संकट कोल्हापूर चित्रपटसृष्टीसाठी इष्टापत्ती ठरली आहे. चित्रनगरीसारखा भव्य दिव्य सेट, लोकेशन, कलाकारांपासून ते तंत्रज्ञांपर्यंतची फळी, स्वच्छ हवा, कमी बजेट या सगळ्या बाजूंनी पॉझिटिव्ह असलेल्या कोल्हापुरात सध्या मोठ्या प्रमाणात चित्रीकरण सुरू आहे. ही घोडदौड पाहता पुढील काही वर्षांत मुंबईनंतर कोल्हापूरच चित्रपटसृष्टीचे हब ठरेल, यात शंका नाही.

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कोल्हापुरात लावलेल्या चित्रपटसृष्टीच्या बीजाचे वटवृक्षात रूपांतर होऊन या शहराने एकेकाळी सिनेजगताला अनेक मोठे कलाकार दिले आहेत. मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही सुवर्णकाळ देणाऱ्या या शहराने आता चित्रीकरणाच्या क्षेत्रातही कात टाकली आहे. कोरोनाने मुंबईला बेहाल केले असताना कोल्हापूर सुरक्षित होते.  त्यामुळे येथील आनंद काळे, मिलिंद अष्टेकर, स्वप्निल राजशेखर, अजय कुरणे, रवी गावडे यांच्या चित्रपट व्यावसायिक समितीने मुंबईतील थांबलेले प्रोजेक्ट कोल्हापुरात आणण्यासाठी धडपड केली.  त्याला यश आल्यानंतर मालिकांचे चित्रीकरण येथे सुरू झाले. आता कोल्हापूर चित्रनगरी सर्व सोयींनी सुसज्ज झाली आहे.

चित्रनगरीचे रेड कार्पेट
राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात १० कोटी खर्चून मोरेवाडी येथील कोल्हापूर चित्रनगरीचा विकास केला. एकाच मोठ्या स्टुडिओच्या भोवतीने पोलीस स्टेशन, न्यायालय, महाविद्यालय, हॉस्पिटल, बंगला अशी रचना आहे. शेजारी वाडा आहे. नंतर ३ कोटींत खुले सेट, पाणी, लाइट, स्वच्छतागृह, गोडाऊन उभारले आहे. महसूल मिळेल त्याप्रमाणे भविष्यात १०० बाय १५० चा मोठा स्टुडिओ, विमानतळ, रेल्वे स्टेशन, मंदिर, असे अगदी हिंदी चित्रपटांसाठी लागणारे लोकेशन्सही तयार करण्यात येणार आहे. 

नैसर्गिक लोकेशन्स
कोल्हापूरचे वातावरण आरोग्यदायी आणि शुद्ध आहे, परिसरातील ग्रामीण भागात अनेक, नैसर्गिक लोकेशन्स आहेत, तर शहरात न्यू पॅलेस, रंकाळा, टाऊन हॉल येथे चित्रीकरण केले जाते. पन्हाळा नगर परिषदेने तर शूटिंग चार्जेस बंद केले आहेत.

तंत्रज्ञांची फळी
 येथे लेखक, दिग्दर्शक, सहदिग्दर्शक, कथाकार, पटकथाकार, संगीतकार, यांच्यापासून ते पहिल्या दुसऱ्या फळीतील कलाकार, तंत्रज्ञ, मॉब आर्टिस्ट, कॅमेरामन मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्याहून येताना मुख्य दिग्दर्शक, कलाकार आणि कॅमेरा आणला की चित्रीकरण सुरू होते. 

दर्जेदार लोकेशन अन् अल्प मोबदल्यात कलाकारही!

सातारा : निसर्गसमृद्ध सातारा जिल्ह्यातील वाई आणि फलटण सध्या चित्रीकरणाचे ‘हॅपनिंग डेस्टिनेश’ ठरत आहे. दर्जेदार लोकेशन आणि अल्प दरात उपलब्ध होणारे स्थानिक कलाकार यामुळे चित्रीकरणासाठी पसंती मिळत आहे.
वाई तालुक्यात दोन आणि फलटण तालुक्यात एका मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. वाईत सुरू असलेल्या चित्रीकरणात ७० टक्के स्थानिकांना संधी दिली आहे, तर फलटणमध्ये बहुतांश कलाकार मुंबईचेच आहेत.
महानगरांच्या तुलनेत लोकल कलाकार ग्लोबल होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.

सातारा जिल्ह्यात चित्रीकरण करण्याला सर्वाधिक पसंती मिळते ते लोकेशनमुळे. येथे चित्रीकरण करताना फार सेट उभे करायची गरज पडत नाही. ऐतिहासिक वाडे, उत्तम वसलेले गाव तयारच मिळत असल्याने चित्रीकरणाचा खर्च वाचतो.
- बाळकृष्ण शिंदे, अभिनेते

चलनवलनाला गती!
चित्रीकरणाने सातारा जिल्ह्याला आर्थिक गती दिली आहे. ग्रामीण भागात जेवण, खोल्या भाड्याने दिल्या जातात. चित्रीकरण पाहण्यासाठी  पर्यटक येतात. त्यामुळे आर्थिक चलनवलनालाही गती मिळत आहे.

Web Title: Shooting of Kolhapur Films on Floor, webseries, reality shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.