Kolhapur: शिवनाकवाडी विषबाधा परिस्थिती नियंत्रणात, बहुतांशी रुग्णांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:17 IST2025-02-07T12:16:44+5:302025-02-07T12:17:10+5:30
विषबाधेचा अहवाल दोन दिवसांत, जिल्हाधिकारी येडगे यांची भेट

Kolhapur: शिवनाकवाडी विषबाधा परिस्थिती नियंत्रणात, बहुतांशी रुग्णांना डिस्चार्ज
कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील परिस्थिती नियंत्रणात असून १६२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून ५२९ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत; तर काहीजण रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नेमकी विषबाधा कशापासून झाली, त्याचा अहवाल दोन दिवसांत स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शासकीय आरोग्य यंत्रणा दक्ष असून गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिवनाकवाडी येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली; तसेच आढावा बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. रुग्णसेवेसाठी कोणत्याही प्रकारची कमतरता पडू दिली जाणार नाही. आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली.
शिवनाकवाडी येथे यात्रेत मंगळवारी अन्नातून विषबाधा झाली होती. बुधवारी पहाटे नागरिकांना उलटी, जुलाब होत असल्याने विषबाधा झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन रुग्णांना उपचारासाठी युद्धपातळीवर सेवा सुरू होती. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी चिंताजनक परिस्थिती नसल्याने व वेळीच योग्य उपचार झाल्याने या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
बहुतांशी रुग्णांना डिस्चार्ज
बुधवारी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी गुरुवारी ५२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. १५१ रुग्णांवर इचलकरंजी आयजीएम रुग्णालयात तर ११ रुग्णांवर दत्तवाड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रशासन अधिसूचना काढणार
शिवनाकवाडीसारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी जिल्ह्यातील यात्रा, जत्रा आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये योग्य ती दक्षता घेण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
अहवाल लवकरच
आरोग्य विभागाने महाप्रसादातील खीर, गावच्या नळ पाणीपुरवठ्याचे पाणी व रुग्णांचे मल तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहेत. त्यामुळे या अहवालाकडे आरोग्य विभागासह ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरोग्य विभागाची टीम
शिवनाकवाडी विषबाधा घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. औषधसाठ्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर डॉक्टरांची टीम व सर्व यंत्रणा दक्ष आहे.