कोल्हापुरात ब्रॅण्डेड चहावाल्यांना टक्कर देतेय मिस चायवाली
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 6, 2025 18:37 IST2025-05-06T18:36:51+5:302025-05-06T18:37:24+5:30
इंदुमती गणेश कोल्हापूर : मिस चायवाली. सुवासिनीनं कुंकवाला आणि मर्दानं चहाला कधी नगं म्हणू नये.., चहाला वेळ नसते, पण वेळेला ...

कोल्हापुरात ब्रॅण्डेड चहावाल्यांना टक्कर देतेय मिस चायवाली
इंदुमती गणेश
कोल्हापूर : मिस चायवाली. सुवासिनीनं कुंकवाला आणि मर्दानं चहाला कधी नगं म्हणू नये.., चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच.. अशा कितीतरी बिरुदावलीतून आपल्या दैनंदिन जीवनात चहाचे महत्त्व अधोरेखित होते.. चहाची तलफ झाली की, आपण आधी चहावाला शोधतो, पण चहावालाच का? कारण तो पुरुष असतो.. या पारंपरिक मानसिकतेला छेद, ब्रॅण्डेड चहावाल्यांना टक्कर देत आहे मिस चायवाली.. म्हणजेच शिवानी पाटील.
हॉकी स्टेडिअम चौकातून पुढे रामानंद नगरकडे निघालो की, उजव्या कोपऱ्याला ‘मिस चायवाली’ असा बोर्ड दिसतो. स्वच्छ, चकाचक गाडीवर २१ वर्षांची ही तरुणी मुरलेल्या व्यावसायिकांप्रमाणे ग्राहकांना हवा तसा फक्कड चहा, कॉफी करून देते. सर्वांशी मोकळेपणाने संवाद, ग्राहकाला दुसऱ्यांदा तिच्या गाडीवर यायला भाग पाडतो. वडील पांडुरंग, आई सविता आणि शिवानी असे हे त्रिकोणी सुखी कुटुंब. पण दोन वर्षांपूर्वी वडील कॅन्सरने दगावले, आई आजारी असल्याने कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आली. घराचे ११ लाखांचे कर्ज फेडत घर चालवण्याची दुहेरी कसरत आहे.
सध्या ती गोखले कॉलेजमधून बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षात बहिस्थ (एक्सटर्नल) शिकते. रात्री आठनंतर अभ्यास करते. तिची ही धडपड पाहून रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष संजय भगत व डॉ. महादेव नरके यांच्या पुढाकारातून संस्थेने तिला १ लाखाची नवी कोरी, मोठी चहाची गाडी बनवून दिली आहे. आता ती पोहे, उप्पीट, शिरा, वडापाव, मिसळसारखे नाष्ट्याचे पदार्थ सुरू करणार आहे. लेकीच्या या धडपडीचा आईला अत्यंतिक अभिमान आहे. तिच्या या कष्टाला सामाजिक पाठबळाची गरज आहे.
स्वावलंबनाचे साैंदर्य हवे
चेहऱ्यावर साधी पावडरसुद्धा नसलेल्या शिवानीची मुलींनी भारी कपडे, मेकअपपेक्षा आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या स्वावलंबी असावे, अशी धारणा आहे. व्यवसाय करताना मुलगी म्हणून समोरची व्यक्ती मला विचित्र वाटली तर मी दुर्लक्ष करते, संवाद टाळते. गाडीवर वेगवेगळ्या मानसिकतेचे लोक येतात, त्यांच्याशी कसे वागायचे हे मी अनुभवातून शिकते. मुलींमध्ये हे धाडस यावे, असे तिचे मत आहे.
प्रत्येक मुलामुलींनी कुटुंबाच्या गरजा ओळखून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भावनिक होऊन व्यवसाय करायचा नाही. कोणतेही काम छोटे नसते, आपण त्यात जीव ओतून, नवी संकल्पना आणत काम करायचे. त्या कष्टाचे फळ नक्की मिळते. - शिवानी पाटील