शिवाजी विद्यापीठ खेळाडूंसाठी यावर्षीपासून देणार ‘प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:07 IST2022-08-04T13:07:22+5:302022-08-04T13:07:54+5:30
खेळाडूंना स्पर्धेदरम्यान कालावधी कमी असल्यास सोयीच्या वाहन प्रकाराने प्रवास करण्यास खास बाब म्हणून परवानगी

शिवाजी विद्यापीठ खेळाडूंसाठी यावर्षीपासून देणार ‘प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती’
कोल्हापूर : अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर क्रीडा शिष्यवृत्ती योजना शिवाजी विद्यापीठाने यावर्षीपासून सुरू केली आहे. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान कालावधी कमी असल्यास सोयीच्या वाहन प्रकाराने प्रवास करण्यास खास बाब म्हणून परवानगी दिली असल्याची माहिती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागाने बुधवारी दिली.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिलेल्या विविध मागण्यांच्या निवेदनानंतर क्रीडा अधिविभागाने कामगिरीची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सुबिया मुल्लाणी, रोहन कांबळे, स्वाती शिंदे, अनुष्का पाटील, संकेत सरगर, नंदिनी साळोखे यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये इतका मदतनिधी दिला आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात बंगळुरू येथे झालेल्या द्वितीय खेलो इंडिया स्पर्धेत विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत एकूण २२ पदके मिळवून देशात १० वा क्रमांक प्राप्त केला. स्पोर्ट्स हॉस्टेल बांधण्यात येणार असून, ३०० खेळाडूंची निवास व्यवस्था तेथे होणार आहे. विद्यापीठाने मिशन ऑलिम्पिक ही संकल्पना घेऊन काम सुरू केले असून, त्या दृष्टीने या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत. इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या क्रीडा विभागाच्या खेळाडूंनी गेल्या पाच वर्षांत एकूण २८० पदकांची कमाई केली असल्याची माहिती या विभागाने दिली.
गेल्या पाच वर्षांतील पदकांची कमाई
वर्ष पदके
२०१६-१७ २९
२०१७-१८ ४४
२०१८-१९ ४०
२०१९-२० ४१
२०२१-२२ १२६