‘टॉप-५०’ राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ; ‘एन.आय.आर.एफ.’ रँकिंगमध्ये उंचावले स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:50 IST2025-09-05T11:50:15+5:302025-09-05T11:50:26+5:30

देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये स्थान कायम राखले

Shivaji University among the Top 50 state universities in the country Ranks higher in NIRF rankings | ‘टॉप-५०’ राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ; ‘एन.आय.आर.एफ.’ रँकिंगमध्ये उंचावले स्थान

‘टॉप-५०’ राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ; ‘एन.आय.आर.एफ.’ रँकिंगमध्ये उंचावले स्थान

कोल्हापूर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२५) मध्ये शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये आपले स्थान कायम राखले. राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीत आगेकूच करीत देशातील आघाडीच्या ५० विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी ही माहिती दिली.

यावर्षीही १५१-२०० या रँकबँडमध्ये शिवाजी विद्यापीठाचे स्थान कायम आहे. गतवर्षीपासून ‘एनआयआरएफ’ने राज्य सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी स्वतंत्रपणे जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यानुसार गेल्यावर्षी शिवाजी विद्यापीठाचा या यादीमध्ये ५१-१०० या रँकबँडमध्ये समावेश झाला होता.

यंदा विद्यापीठाने क्रमवारीत आणखी आगेकूच करीत १-५० या रँकबँडमध्ये स्थान प्राप्त केले. देशातील आघाडीच्या ५० विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ आता ५१.८० गुणांकनासह ४५ व्या स्थानी पोहोचले आहे. या यादीत महाराष्ट्रातील आणखी ३ विद्यापीठे आहेत. त्यात ११ व्या स्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, १२ व्या स्थानी मुंबई विद्यापीठ आणि ४३ व्या स्थानी पुण्याचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आहे.

काय आहेत निकष

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी अध्यापन- अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतिशीलता, विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण, महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय या निकषांवर क्रमवारी आधारित आहे.

राष्ट्रीय पातळीवरील क्रमवारीमध्ये शिवाजी विद्यापीठाने मोठी झेप घेऊन अभिमानास्पद कामगिरी नोंदविली आहे. सहभागी होणाऱ्या समग्र शैक्षणिक संस्थांची संख्या वाढती असतानाही शिवाजी विद्यापीठाचे या क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. -डॉ. डी.टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

Web Title: Shivaji University among the Top 50 state universities in the country Ranks higher in NIRF rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.