Kolhapur Politics: ‘कोल्हापूर’ मतदारसंघ धरावा की सोडावा; काँग्रेसचा दावा अद्यापही कायम 

By राजाराम लोंढे | Published: February 20, 2024 12:16 PM2024-02-20T12:16:34+5:302024-02-20T12:17:10+5:30

शिवसेना (उबाठा) नेत्यांची चाचपणी, ‘पवार-सतेज’ यांची डीनर डिप्लोमसी  

Shiv Sena Thackeray Group Scrutiny Regarding Kolhapur Lok Sabha Constituency, Congress claim upheld | Kolhapur Politics: ‘कोल्हापूर’ मतदारसंघ धरावा की सोडावा; काँग्रेसचा दावा अद्यापही कायम 

Kolhapur Politics: ‘कोल्हापूर’ मतदारसंघ धरावा की सोडावा; काँग्रेसचा दावा अद्यापही कायम 

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघावरचा शिवसेनेने (उबाठा) अद्याप दावा सोडला नसला तरी मतदारसंघ घेतला तर विजयी होईल का? अन्यथा यावरील दावा सोडून त्याबदल्यात इतर सुरक्षित मतदारसंघ घ्यावा का? याची चाचपणी पक्षात सुरू आहे. काँग्रेसचे अजून प्रयत्न सुरू असले तरी त्यांच्याकडे तगडा उमेदवार सध्या तरी दिसत नाही. त्यांची सगळी मदार शाहू छत्रपती यांच्यावर दिसत असून, दोन दिवसांत आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘उबाठा’कडून ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या तिघांना बोलावून घेऊन उलटसुलट चाचपणी केली आहे. मतदारसंघातील राजकीय समीकरणे, त्यांची राजकीय ताकद आणि शह-काटशहाच्या राजकारणात कोण कोण मदत करू शकतो? याची माहिती घेतली आहे.

पक्षाने अद्याप जागेवरील दावा सोडला नसला तरी जागा घेतली तर तिथे यश मिळेल का? याची खात्री पक्षनेतृत्वाला नाही. या जागेवरील हक्क सोडू नये, असा पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे. त्यामुळे बहुतांशी मतदारसंघात पक्षाने सिग्नल दिले असले तरी कोल्हापूरबाबत मात्र अद्याप वेट अँड वॉच अशीच भूमिका आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ‘उबाठा’ गटाची ‘मावळ’वरच बोळवण?

पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभेच्या जागांपैकी ‘कोल्हापूर’ व ‘मावळ’वर शिवसेनेने (उबाठा) दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ‘बारामती’, ’शिरूर’, ‘माढा’, ‘सातारा’ हे चार, तर काँग्रेसकडे ‘पुणे’, ‘सोलापूर’ व ‘सांगली’ची जागा राहणार आहे. ‘हातकणंगले’ ही जागा स्वाभिमानीला सोडली जाऊ शकते. ‘स्वाभिमानी’ने नकारच दिला तर ‘उबाठा’ कडून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा पत्ता पुढे केला जाऊ शकतो. कोल्हापूरच्या जागेवर अजूनही जर-तर आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी ‘मावळ’वरच बोळवण होण्याची शक्यता आहे.

‘जालना’, ‘कोल्हापूर’वर जागा वाटप आडले

महाविकास आघाडीमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जागा वाटपावर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे कोणी कोणत्या जागेवर लढायचे हे जवळपास निश्चित झाले आहे. मुंबईतील एका मतदारसंघासह ‘जालना’ व ‘कोल्हापूर’वर काँग्रेसने दावा केल्याने जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे.

‘पवार-सतेज’ यांची डीनर डिप्लोमसी

ज्येष्ठ नेते शरद पवार आज, मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असून, ते रात्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या घरी जेवण करणार आहेत. दोन्ही काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून, येथेच ‘कोल्हापूर’बाबत व्यूहरचना ठरली जाणार आहे.

Web Title: Shiv Sena Thackeray Group Scrutiny Regarding Kolhapur Lok Sabha Constituency, Congress claim upheld

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.