कोल्हापूर: अब्दुल सत्तार, संजय राठोडांविरोधात शिवसेनेचे 'जोडे मारो' आंदोलन
By राजाराम लोंढे | Updated: August 9, 2022 18:24 IST2022-08-09T18:23:26+5:302022-08-09T18:24:54+5:30
स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे

छाया : आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार अखेर आज, मंगळवारी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. मंत्रिमंडळात भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अब्दुल सत्तार व संजय राठोड यांचा समावेश आहे. या दोघा मंत्र्यांविरोधात आज, मंगळवारी शिवसेनेने कोल्हापुरातील शिवाजी चौकात निदर्शने करत जोडे मारो आंदोलन केले. यावेळी सत्तार व राठोड या मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, चारित्र्यावरून ज्यांना राजीनामा द्यावा लागला, ते संजय राठोड व टीईटी घोटाळ्यात ज्यांच्या मुलांची नावे आली ते अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. भाजपमध्ये भ्रष्टाचारी टोळी तयार झाली आहे.
शिवसेनेचे उत्तर शहर प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपने आरोप असणाऱ्यांना मंत्री केले. या निर्णयाचा शिवसेना निषेध करत असून, त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत अशी मागणी केली.
यावेळी या आंदोलनात मंजीत माने, विशाल देवकुळे, धनाजी दळवी, स्मिता सावंत, शैलेश हिराकर, अवधेश करंबे, मंगेश चितारे, नीलेश सूर्यवंशी, रघुनंदन भाले, प्रथमेश देशिंगे, पवन तोरस्कर आदी उपस्थित होते.