रात्रभर गाडी सजवली, फलक-स्पीकर लावून शहरभर फेरी मारली; शिवजयंती दिनीच कोल्हापुरात शिवभक्ताचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:25 IST2025-04-30T13:24:22+5:302025-04-30T13:25:37+5:30
लोकमतवर विशेष प्रेम

रात्रभर गाडी सजवली, फलक-स्पीकर लावून शहरभर फेरी मारली; शिवजयंती दिनीच कोल्हापुरात शिवभक्ताचा मृत्यू
कोल्हापूर : शिवजयंती असल्याने त्यांनी रात्रभर गाडी सजवली, प्रबोधनाचे संदेश देणारे फलक व स्पीकर लावून मंडळाच्या उत्सव कार्यक्रमांना भेटी दिल्या, मंगळवारी सकाळी उठून शिवाजी चौक, दसरा चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी प्लास्टरच्या मूर्तीवरील बंदी हटवण्याचे निवेदन द्यायला पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. मात्र, येथेच त्यांना चक्कर आल्याचे निमित्त झाले अन् नियतीने शिवभक्ताची ही प्रबोधनात्मक रिंगण फेरी अर्ध्यावरतीच रोखली.
मारुती उर्फ बाळासाहेब धोंडिराम निगवेकर (वय ७१) असे या शिवभक्ताचे नाव. गंगावेशजवळच्या धोत्री गल्लीत गणेशमूर्ती बनवण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. कुंभारमामा या नावानेच ते सर्वपरिचित होते. आपल्या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन त्यांनी कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांवर प्रबोधनात्मक जागर केला होता. प्रत्येक शिवजयंतीला ते गाडीवर वेगळा संदेश लिहून जनजागृती करत होते.
यंदाही त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदी हटवण्याच्या मागणीचा फलक लावून शहरभर फेरी सुरू केली होती. पोलिस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांना चक्कर आल्याने ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, येथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, गुरुवारी आहे.
लोकमतवर विशेष प्रेम
निगवेकर यांचे लोकमतवर विशेष प्रेम होते. प्रत्येक वर्धापनदिनाला उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचा त्यांचा शिरस्ता कधीच चुकला नाही.