Bharat Jodo Yatra: कोल्हापूरच्या शर्वरीची राहूल गांधींसमवेत स्वप्नवत भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 18:59 IST2022-11-09T18:58:56+5:302022-11-09T18:59:20+5:30
भेट आणि गप्पांनी भारावलेल्या शर्वरीसाठी हा पाच मिनिटांचा प्रवास आयुष्यभरासाठीची आठवण आणि ऊर्जा देऊन गेला.

Bharat Jodo Yatra: कोल्हापूरच्या शर्वरीची राहूल गांधींसमवेत स्वप्नवत भेट
कोल्हापूर : तुम्ही कोठून आला आहात, काय करता, तुम्ही कोणकोणत्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवता अशी आस्थेने विचारपूस करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूरच्या शर्वरी माणगावे हिला मी कोल्हापुरात आलो तर तुझ्याकडे आईस्क्रीम खायला नक्की येईन, असा शब्द मंगळवारी दिला. त्यांची भेट आणि गप्पांनी भारावलेल्या शर्वरीसाठी हा पाच मिनिटांचा प्रवास आयुष्यभरासाठीची आठवण आणि ऊर्जा देऊन गेला.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी महाराष्ट्रात पोहोचली. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. त्यांच्या भोवती ५०० मीटर अंतरापर्यंत कोणीही नसतं; पण शर्वरीला काही करून त्यांना भेटायचंच होतं. तिने २-३ वेळा राहुल गांधींना हाक मारली. तिसरी हाक ऐकून त्यांनी तिच्याकडे बघितले. तिने मुझे आपको मिलना है... असे सांगितले. त्यांनी आत बोलावले आणि तिच्या हातात हात घालून चालू लागले. तिची आस्थेने चौकशी केली.
शर्वरीने मी कोल्हापूरची आहे. टेम्पोवर रोलिंग स्टोनवर आईस्क्रीम बनवत असल्याचे सांगितले. राहुल यांनी टेम्पो तुम्ही स्वत: चालवता का, कोणकोणत्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवता याची माहिती घेऊन फोटो पाहिले. सामान्य कुटुंबातील मुलगी स्वेच्छेने भारत जोडो यात्रेत सहभागी होते, शिक्षण घेत हिमतीवर व्यवसाय चालवते याबद्दल तिचे कौतुक केले. आईस्क्रीमचा ब्रॅंड मोठं करा, मी कोल्हापूरला आलो की तुमच्याकडे आईस्क्रीम नक्की खाईन असा शब्दच त्यांनी दिला. हा प्रवास शर्वरीसाठी ऊर्जा देणारा ठरला.
नवा आशावाद...
शर्वरी सांगते, मी काही काँग्रेसची कार्यकर्ती नाही. आपल्या विचारांची, एक चांगली व्यक्ती म्हणून मला राहुल गांधींना भेटायची, पदयात्रेचा अनुभव घेण्याची इच्छा होती. पहिल्या दिवशी १० किलोमीटर चालले. मंगळवारी सकाळी ९ वाजता मी त्यांना भेटले. एवढा मोठा नेता असूनही त्यांच्यातील साधेपणा भावला. म्हणूनच कदाचित भारत जोडो यात्रेत कार्यकर्त्यांपेक्षाही सर्वसामान्यांचा सहभाग जास्त आहे. लोकांना त्यांच्या नेतृत्वात नवा आशावाद दिसत असल्याचा अनुभव यात्रेत आला.