ठेकेदार, दलालांसाठी 'शक्तिपीठ'चा डाव; विनायक राऊत यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:10 IST2025-07-21T18:08:50+5:302025-07-21T18:10:12+5:30

दिल्लीपुढे मुजरे करणारे हुजरे तयार झालेत

Shaktipeeth highway plot for contractors, brokers, Vinayak Raut alleges | ठेकेदार, दलालांसाठी 'शक्तिपीठ'चा डाव; विनायक राऊत यांचा आरोप 

ठेकेदार, दलालांसाठी 'शक्तिपीठ'चा डाव; विनायक राऊत यांचा आरोप 

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग भाजपचे ठेकेदार, दलालांसाठी करून शेतकऱ्यांच्या घरावर वरवंटा फिरवला जाणार आहे. मात्र, जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग पंचगंगा नदीत विसर्जित होत नाही, तोपर्यंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसू नये, असे आवाहन उद्धवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी रविवारी केले. यावेळी जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर मशाल उजळवावा, असेही त्यांनी सांगितले.

उद्धवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. आमदार सुनील प्रभू, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राऊत म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर या आश्वासनाचा विसर महायुतीच्या सरकारला पडला आहे. लाडक्या बहिणींना अजून दरमहा २१०० दिले नाहीत. पण, ठेकेदारांच्या भल्यासाठी शक्तीपीठ केले जाणार आहे. याचा एक किलोमीटरचा खर्च १०० कोटी रुपये आहे. इतका खर्च करणार म्हणजे सोन्यानी रस्ता करणार आहेत का ?

आमदार सुनील प्रभू म्हणाले, मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद झाले आहे. सरकार ही योजनाच गुंडाळणार आहे.

प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, महाराष्ट्र कमजोर केला जात आहे. स्वत:च्या मराठी भाषेसाठी महाराष्ट्राला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. म्हणून, येत्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकववा.

संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांची भाषणे झाली. मेळाव्यास माजी आमदार सत्यजीत पाटील-सरूडकर, विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, प्रकाश शिरोळकर आदी उपस्थित होते.

संजय पवार यांची नाराजी कायम

जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यापासून संजय पवार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर न झाल्यानेच ते उपस्थित राहिले नाहीत, अशी मेळाव्याच्या ठिकाणी चर्चा होती. यामुळेच राऊत यांनी संजय पवार घरगुती कारणांमुळे गैरहजर राहिले, असा खुलासा केला.

पन्नास खोके..एकदम ओके..घोषणा

शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना गद्दार असे राऊत म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांनी पन्नास खोके, एकदम ओके, अशी घोषणाबाजी करून लक्ष वेधले.

शंभर कोटी कोणाच्या घशात ?

आमदार सुनील प्रभू म्हणाले, शहरातील रस्त्यावर शंभर कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. मात्र सध्या शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. मग शंभर कोटी रुपये कोणाच्या घशात गेले ? शक्तिपीठ महामार्ग अदानीचे भले करण्यासाठी करून शेतकऱ्यांच्या घरावर वरवंटा फिरवला जाणार आहे.

दिल्लीपुढे मुजरे करणारे हुजरे तयार झालेत

प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, एकेकाळी दिल्लीच्या राजकारणावर महाराष्ट्राचा दबदबा होता. सध्या दिल्लीपुढे मुजरे करणारे हुजरे तयार झाले आहेत. ते राज्यातील उद्योग गुजरातला नेत आहेत. फोडा आणि तोडा ही नीती वापरली जात आहे.

Web Title: Shaktipeeth highway plot for contractors, brokers, Vinayak Raut alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.