Kolhapur: शाहू वैद्यकीय नगरी विद्यार्थ्यांसाठी सज्ज, मंत्री मुश्रीफ यांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:25 IST2024-12-31T16:24:42+5:302024-12-31T16:25:20+5:30
लवकरच शाहू पुतळा उभारणार; शाहू वैद्यकीय नगरीची सुचना‘लोकमत’ची

Kolhapur: शाहू वैद्यकीय नगरी विद्यार्थ्यांसाठी सज्ज, मंत्री मुश्रीफ यांनी केली पाहणी
कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २९ एकरात शाहू वैद्यकीय नगरी उभारण्याचे काम सुरू आहे. यातील पूर्ण झालेल्या इमारती सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आल्या. यामध्ये मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह इमारत, व्याख्यान कक्ष व परीक्षा कक्षाचा समावेश आहे. ही वैद्यकीय नगरी विद्यार्थ्यांसाठी आता सज्ज झाली आहे, असे मनाेगत मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केले.
या इमारत प्रवेशावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, मागील कार्यकाळात वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्यावर होती. ही कामे मंजूर झाली, तेव्हा या परिसरात अत्यंत दुरवस्था होती. मात्र, आज हा परिसर अतिशय चकाचक झाला आहे. येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची चांगली सोय करण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागाने या ठिकाणी केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे. मुश्रीफ यांनी यावेळी मुलींच्या अद्ययावत वसतीगृहातील खोल्यांची पाहणी केली. तेथील कार्यालय, तसेच इतर सुविधा पाहिल्या. शवविच्छेदन गृहातील विविध सोयी सुविधांबाबतही त्यांनी माहिती घेतली.
या परिसरामध्ये सर्व रस्ते हे काँक्रीटचे करण्यात आलेले आहेत. मुलांना अभ्यास करण्याकरिता चांगले वातावरण राहावे, याकरिता लँडस्केपिंग आहे. प्रशस्त भव्य प्रवेशद्वार व वाहनतळ, खुले सभागृह, खुली व्यायामशाळाही उभारण्यात येणार आहे. या परिसरात २५० खाटांच्या कॅन्सर हॉस्पिटल, २५० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व ६०० खाटांच्या सामान्य रुग्णालय इमारतीचे बांधकाम अशा ५६७ कोटी रुपयांच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे.
शाहू वैद्यकीय नगरीची सुचना‘लोकमत’ची
कुष्ठ रुग्णांसाठी शेंडा पार्कची जागा राखीव ठेवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचे नाव या परिसरातला द्यावे. या परिसराचे ‘शाहू महाराज वैद्यकीय नगरी’ असे नामकरण करावे, अशी सूचना ‘लोकमत’ने केली होती. ती तातडीने मुश्रीफ यांनी मान्य केली. इतकेच नव्हे तर यापुढे जात त्यांनी या परिसरात शाहू महाराजांचा भव्य पुतळाही उभारण्याचा निर्णय घेतला.