‘शाहू चरित्र’ विस्तृतपणे समोर येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:25 AM2018-08-27T00:25:29+5:302018-08-27T00:25:32+5:30

'Shahu character' can be seen in a big way | ‘शाहू चरित्र’ विस्तृतपणे समोर येईल

‘शाहू चरित्र’ विस्तृतपणे समोर येईल

Next

कोल्हापूर : पूर्वीच्या शाहू चरित्रग्रंथात जे राहिले, ते लोकांना नव्याने माहीत व्हावे, या उद्देशाने राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे. या ग्रंथातून राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन, कार्यचरित्र विस्तृतपणे समोर येईल, असे प्रतिपादन माजी आमदार मालोजीराजे यांनी रविवारी येथे केले.
महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे विस्तारित आणि नव्याने प्रकाशित केल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाच्या मुद्रण प्रारंभावेळी ते बोलत होते. येथील भारती मुद्रणालयातील या कार्यक्रमास ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते.
माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, राजर्षी शाहूंबाबतची माहिती देणारे अनेक ग्रंथ, पुस्तिका निघाल्या; पण इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी जो पहिला राजर्षी शाहू गौरवग्रंथ प्रकाशित केला, त्यातील संदर्भ, माहिती इतर कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. राजर्षी शाहूंचे कार्य, विचार जगभरात पोहोचावेत यासाठी या गौरवग्रंथाचा विविध भाषांमध्ये अनुवाद केला. या शाहूचरित्रामध्ये जे राहून गेले, ते नव्याने समाविष्ट करून विस्तारित स्वरूपात लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ प्रकाशित होत आहे. राजर्षी शाहूंनी कोल्हापूरसह पुण्यात शिक्षण संस्थांना मदत केली. त्याद्वारे बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या ऋणाची थोडीशी उतराई म्हणून ‘आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’ने या स्मारक ग्रंथाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. या ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन केले जाईल. तरुण पिढीमध्ये राजर्षी शाहूंचे विचार रुजविण्याचे काम प्रबोधिनी करत आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार म्हणाले, या ग्रंथाच्या तिसºया आवृत्तीत दोन खंडांची भर टाकली आहे. त्याच्या दहा हजार प्रतींच्या छपाईसाठी सुमारे ५० लाखांचा खर्च होणार आहे. त्यासाठी माजी आमदार मालोजीराजे यांनी मदतीचा हात दिला.
या कार्यक्रमास वसुधा पवार, विजयराव शिंदे, डॉ. प्रकाश शिंदे, निहाल शिपूरकर, तनुजा शिपूरकर, अरूंधती पवार, प्रशांत साळुंखे, पंडित कंदले, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी स्वागत केले. ग्रंथाच्या संपादक डॉ. मंजूश्री पवार यांनी आभार मानले.
रक्षाबंधनदिवशी राजर्षी शाहू यांनी दिला डोईचा मंडल
राजर्षी शाहू हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांच्याबाबतच्या बारीकसारीक गोष्टींची या पंचखंडात्मक ग्रंथात नोंद घेतली आहे. त्यातील एक उदाहरण म्हणजे चाबूकस्वाराच्या पत्नीने रक्षाबंधनादिवशी राजर्षी शाहूंचे औक्षण केल्यानंतर तिला ओवाळणी म्हणून त्यांनी आपल्या डोईचा मंडल दिल्याची आठवण ग्रंथात नोंदविली असल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, १६०० पानांच्या विस्तारित ग्रंथात कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे, प्रा. एन. डी. पाटील, भाई वैद्य, शरद पवार, रावसाहेब कसबे, रघुनाथ माशेलकर, आदींच्या लेखांचा समावेश आहे. या गं्रंथाचे प्रकाशन दसरा-दिवाळीदरम्यान होईल.
सर्वसामान्यांचा समावेश
सन २००१ मध्ये प्रकाशित केलेल्या राजर्षी शाहू स्मारक ग्रंथात आता आणखी दोन खंडांची भर घालून या ग्रंथाची तिसरी विस्तारित नवी आवृत्ती या पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाद्वारे प्रबोधिनीद्वारे प्रकाशित होणार आहे. त्यात दुर्मीळ, जुनी, मूळ कागदपत्रे आणि शाहूकालीन चाबूकस्वार, वाहनचालक अशा सर्वसामान्य लोकांची छायाचित्रे, माहिती समाविष्ट केली असल्याचे
डॉ. मंजूश्री पवार यांनी सांगितले.

Web Title: 'Shahu character' can be seen in a big way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.