कोल्हापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातून तयारी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून अनेक आंदोलक गुरुवारी मुंबईला रवाना झाले असून शुक्रवारी सकाळी दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.येथील शिवाजी पेठेतील शाहीर दिलीप सावंत यांनी मुंबईकडे निघताना ऐतिहासिक दसरा चौकात आपल्या सहकाऱ्यांसह मराठा आरक्षणावर पोवाडा सादर केला. यावेळी ‘मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या..कोल्हापूरच्या झोंबणार तुम्हाला मिरच्या, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या,’ असा पोवाडा सादर केला. शाहीर दिलीप सावंत हे डफावर थाप देत आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईतील मराठा आरक्षणाच्या मोर्चात सहभागी होणार आहेत.आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचे नाही, असा निर्धार करत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्यासह मराठा आंदोलक मुंबईसाठी कोल्हापुरातून रवाना झाले आहेत.परंतु गणेश चतुर्थीमुळे जे मराठा बांधव मुंबईला जाऊ शकत नाहीत, अशा बांधवांच्यावतीने आज, शुक्रवारी दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शिवाजी मंदिर येथून सकल मराठा बांधव मोटारसायकल रॅलीने दसरा चौकात दाखल झाले.
मराठा आरक्षणासाठी शाहूनगरीचे शाहीर मुंबईकडे रवाना
मुंबईत मराठ्यांचा मोर्चा धडकला, कोल्हापुरात मराठा समाज एकवटला पाहा