अनेकदा आरोग्यवर्धिनीमध्ये कर्मचारी वेळेत येत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देतात. स्थानिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात नाही, या कारणावरून आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी चांगलेच धारेवर धरत यावेळी जाब विचारला.
केंद्राअंतर्गत चौदा गावांतील ज्येष्ठ नागरिकांना १५० लसींचे डोस आले होते. लसीकरणासाठी गर्दी झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून डोस संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त स्थानिक लोकांनी आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. अशातच एका महिला गटप्रवर्तक कर्मचाऱ्याने उद्धट उत्तरे दिल्याने तणाव निर्माण झाला. यानंतर या महिला कर्मचाऱ्यांनी माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
कोरोना महामारीत रात्रपाळीसाठी कर्मचारी उपस्थित नसतात. लसीकरणासाठी स्थानिक लोकांना डावलून बाहेरच्या लोकांना बोलावून लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक गौडबंगाल आहे का, याचीही वरिष्ठांनी चौकशी करावी. तसेच वेळेत न येणाऱ्या व नागरिकांना उद्धट उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत यापुढे स्थानिक लोकांना लसीकरणासाठी प्रथम प्राधान्य देऊन आरोग्यवर्धिनीमध्ये अशा प्रकारची नव्याने पुनरावृत्ती झाल्यास आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकण्याचा इशारा उपस्थितांनी आरोग्याधिकारी यांना यावेळी दिला.
........................
चौकट -
आरोग्य केंद्रात लसीचे डोस मागणीपेक्षा कमी येतात. उपलब्धतेनुसार लसीचे डोस देत आहोत. कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकीसाठी माफी मागितली असून यापुढे लसीकरण मोहिमेत आग्रही राहत असून नागरिकांनी सहकार्य करावे. कर्मचाऱ्यांना पारदर्शी कामाबाबत सूचना केल्या आहेत.
- रूपाली भिसे
वैद्यकीय अधिकारी पडळ.