Arjuna Award: कोल्हापूरच्या मातीत खेळाचा गुण..सातजण झाले 'अर्जुन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:06 IST2025-01-03T14:06:16+5:302025-01-03T14:06:34+5:30

ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत देशाला पदक मिळवून देणाऱ्या स्वप्निल कुसाळेला गुरुवारी अर्जुन पुरस्कार जाहीर

Seven athletes from Kolhapur won the prestigious Arjuna Award in the country | Arjuna Award: कोल्हापूरच्या मातीत खेळाचा गुण..सातजण झाले 'अर्जुन'

Arjuna Award: कोल्हापूरच्या मातीत खेळाचा गुण..सातजण झाले 'अर्जुन'

कोल्हापूर : पिवळा धम्मक गूळ, झणझणीत मिसळ, सौंदर्य खुलविणारा कोल्हापुरी साज, रुबाबदार कोल्हापुरी चप्पल, जिभेला वेड लावणारा कोल्हापुरी तांबडा-पांढरा आणि तांबड्या मातीतली कोल्हापुरी कुस्ती ही ओळख आता कोल्हापुरातील नेमबाजी, जलतरण या खेळांपर्यंत येऊन पोहचली आहे. कुस्तीच्या बरोबरीने इतर खेळांमध्येही जगभर डंका वाजल्याने आतापर्यंत एकट्या कोल्हापुरातील सात खेळाडूंनी देशातील प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत देशाला पदक मिळवून देणाऱ्या स्वप्निल कुसाळेला गुरुवारी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. कोल्हापूरच्या सुपुत्राला मिळालेल्या या सन्मानाने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यानिमित्ताने कोल्हापूरची तांबडी माती विविध खेळांची खाण असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. याआधी कोल्हापूरचे महान पैलवान गणपतराव आंदळकर, टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे, जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत व कोल्हापूरचा सुपुत्र पॅरा जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील हे अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

हे आहेत कोल्हापुरातील अर्जुन पुरस्कार विजेते

खेळाडूचे नाव  - क्रीडा प्रकार  - वर्ष

  • गणपतराव आंदळकर : कुस्ती - १९६४
  • शैलजा साळोखे :  टेबल टेनिस - १९७८
  • तेजस्विनी सावंत : नेमबाजी - २०११
  • वीरधवल खाडे : जलतरण - २०११
  • राही सरनोबत : नेमबाज - २०१८
  • स्वप्नील पाटील : पॅरालिम्पिक जलतरण - २०२२
  • स्वप्नील कुसाळे :  नेमबाज  - २०२५


स्वप्नीलला अर्जुन पुरस्कार जाहीर होणे हे त्याच्या १५ वर्षांच्या अथक कष्टाचे फळ आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाने नेमबाजीत देशाचे नाव जगभर केले याचा वडील म्हणून मला आनंद आहे. केंद्र व राज्य सरकारनेही त्याच्या या कामगिरीची योग्य दखल घेतली, याचा मनस्वी आनंद आहे. -सुरेश कुसाळे, स्वप्नीलचे वडील

Web Title: Seven athletes from Kolhapur won the prestigious Arjuna Award in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.