यंदा हंगाम तीन महिन्यांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:52 PM2019-11-03T23:52:19+5:302019-11-03T23:52:23+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि ...

This season is only three months | यंदा हंगाम तीन महिन्यांचाच

यंदा हंगाम तीन महिन्यांचाच

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि अतिवृष्टीने हे कोठार यंदा रितच राहणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उसाचे ८० लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला जात असून, गळीत हंगाम तीन महिने चालविताना साखर कारखान्यांची दमछाक होणार आहे. उसाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहेच, त्याचबरोबर अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडलेले साखर कारखाने आणखी अडचणीत येणार, हे मात्र निश्चित आहे.
राज्याच्या एकूण ऊस उत्पादनापैकी ३० टक्के ऊस हा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उत्पादित होतो. मागील हंगामात राज्यात ९ कोटी ५१ लाख टन गाळप झाले होते, त्यामध्ये सर्वाधिक दोन कोटी १६ लाख गाळप कोल्हापूर विभागाचे होते. विशेष म्हणजे अवघ्या ३८ कारखान्यांनी हे गाळप केले असून, साखर उताºयातही हा विभाग आघाडीवर राहिला; पण यंदा हे कोठार अडचणीत सापडले आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरवरील ऊस बाधित झाला आहे. त्याच पटीत सांगली जिल्ह्यातील उसाचे नुकसान झाले. पूरबाधित नाही तिथे एकसारख्या पावसाने वाढ खुंटली. ज्या काळात उसाची वाढ झपाट्याने होते, त्याच काळात पाऊस राहिल्याने वाढीवर परिणाम झाला; त्यामुळे पूरबाधित उसाचे ५० टक्क्याने, तर इतर उसाचे २० ते २५ टक्क्यांनी उत्पादन घटणार आहे. सरासरी ३५ टक्के घट जरी झाली, तरी गेल्या हंगामापेक्षा ८० लाख टन उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामध्ये कोल्हापुरात ८० ते ९० लाख टन, तर सांगलीत ५५ ते ६० लाख टनापर्यंत उत्पादन खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एकरकमी ‘एफआरपी’वर ठाम?
महापूर व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; त्यामुळे किमान एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यावर ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना ठाम राहणार आहे. मागील हंगामात बहुतांशी कारखान्यांनी दोन, तर काही कारखान्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी दिली होती. तोच फॉर्म्युला यावर्षी राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

हंगाम महिनाभर लांबणीवर
कर्नाटकात आॅक्टोबर अखेरीस हंगाम सुरू होत असल्याने सोलापूर, सांगली व कोल्हापुरातील सीमाभागातील कारखान्यांची १ नोव्हेंबरलाच धुराडी पेटत होती.
यंदा मात्र परतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे आहे, पाणी कमी होऊन जमिनीला वापसा येण्यास अजून १५ दिवस लागणार आहेत; त्यामुळे जर पाऊस थांबला, तर १५ नोव्हेंबरनंतर काही कारखाने सुरू होतील, अन्यथा नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा उजाडू शकतो.
कारखाना अन् ‘एफआरपी’ रक्कम

शाहू २८७८
हमिदवाडा २९५३
बिद्री २९६४
भोगावती २८३७
घोरपडे २६६९
कुंभी २९२९
जवाहर २८७४
शिरोळ २८३५
शरद २८२७
गुरुदत्त ३०७०
पंचगंगा २९४६
आजरा २७४६
राजाराम २७७१
वारणा २६००
दालमिया ३०१७
गडहिंग्लज २७०३
डी. वाय. २७६९
गायकवाड २८२८
इको केन २६१७
हेमरस २८७०
महाडिक २३१७
तांबाळे २६३८

Web Title: This season is only three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.