कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध, निवड समितीसाठी तीन नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:53 IST2025-05-06T17:52:37+5:302025-05-06T17:53:04+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची कुलगुरूपदाची पाच वर्षांची मुदत येत्या ७ ऑक्टोबरला संपणार असल्याने ...

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध, निवड समितीसाठी तीन नावे
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची कुलगुरूपदाची पाच वर्षांची मुदत येत्या ७ ऑक्टोबरला संपणार असल्याने कुलपती कार्यालयाने आता नव्या कुलगुरूंची शोधमोहीम प्रक्रिया सुरू केली आहे.
कुलपती कार्यालयाकडून लवकरच कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने एका सदस्याचे नाव निवड समितीसाठी पाठवण्याच्या सूचना कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या वतीने निवड समितीसाठी तीन नावे पाठवण्यास सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सध्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी प्रभारी कुलगुरू नितीन करमळकर यांच्याकडून कार्यभार स्वीकारला होता. डॉ. शिर्के यांचा ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवड समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचा एक सदस्य देण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने तातडीची व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये इंदोर येथील आयआयटीचे संचालक सुहास जोशी, हैद्राबाद येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्सचे कुलगुरू व्ही. रामगोपाल राब, पंजाबमधील रोपार येथील आयआयटीचे संचालक राजीव अहुजा ही तीन नावे कुलपती कार्यालयास पाठवण्यास मान्यता देण्यात आली. कुलपती कार्यालयाकडून या तीनपैकी एका सदस्याची निवड कुलगुरू निवड समितीसाठी केली जाणार आहे.