गडहिंग्लज : भडगाव येथील शाळकरी मुलीने स्वयंपाक खोलीतील लाकडी तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लीलावती भीमराव जंगली (वय १५) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, भडगाव येथील भीमराव जंगली हे शेती व सेंट्रिगचे काम करतात. त्यांची मुलगी लीलावती ही येथील शाळेत आठवीतून नववीत जाणार होती.दरम्यान, शनिवारी घरातील मंडळी सोयाबीनच्या पेरणीला गेले होते. त्यांच्यासोबत तीही गेली होती. रात्री जेवणानंतर सर्वजण झोपी गेले. चारच्या सुमारास त्यांच्या वडिलांना जाग आली. त्यावेळी लीलावती अंथरुणात दिसली नाही. त्यांनी घरात शोधाशोध केली असता तिने जेवणाच्या खोलीत गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.तिला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, चुलते असा मोठा परिवार आहे. वडील भीमराव जंगली यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
Kolhapur: रात्री सर्वजण झोपी गेले, शाळकरी मुलीने स्वयंपाक खोलीत गळफास घेत जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:39 IST