‘सावकर’, 'प्रकाशआण्णा’ वाकड्यात, जिल्ह्याची राजकीय दिशा बदलणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 03:29 PM2022-01-13T15:29:18+5:302022-01-13T15:36:19+5:30

आमदार विनय कोरे यांनी ‘पापा’ची किंमत तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘पांग’ फेडण्याचा इशारा देऊन भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

‘Savkar’, ‘Prakash Anna’ will change the political direction of the district again | ‘सावकर’, 'प्रकाशआण्णा’ वाकड्यात, जिल्ह्याची राजकीय दिशा बदलणार 

‘सावकर’, 'प्रकाशआण्णा’ वाकड्यात, जिल्ह्याची राजकीय दिशा बदलणार 

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निकालाने सत्तारूढ आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून त्यातून आमदार विनय कोरे यांनी ‘पापा’ची किंमत तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘पांग’ फेडण्याचा इशारा देऊन भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. आवाडे यांना गडहिंग्लज विभागासह राधानगरी, करवीर, कोल्हापूर शहराने झटका दिला असला तरी त्यांच्या होमपिच ‘हातकणंगले’मध्ये अर्जुन आबीटकर यांनी घेतलेल्या ६९ मतांनी पराभवाचा पाया रचला, हेही विसरता येणार नाही.

विधानपरिषद निवडणुकीपासून जिल्ह्यात विनय काेरे, प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक यांनी मोट बांधली आहे. वडगाव बाजार समितीमध्ये तिन्ही नेत्यांनी ताकद दाखवून देत जिल्हा बँकेची तयारी सुरू केली होती. सत्तारुढ आघाडीतील नाराजांना सोबत घेऊन पॅनेलची तयारी केली होती. त्यामुळेच सत्तारुढ गटाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत काेरे व आवाडे यांना आत घेऊन ‘बिनविरोध’चा प्रयत्न केला. मात्र, अनपेक्षितपणे सोबत असणारे बाजूला गेले आणि निवडणूक लागली.

सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे पतसंस्था-बँका गटातील मतदारांची संख्या आवाडे यांना विजयापर्यंत नेणारी होती. सर्व नेते आपणाला मदत करतील, या आशेवर आवाडे गाफिल राहिले आणि तिथेच दणका बसला. ‘पतसंस्था’ गटातील पराभव आवाडे यांच्या जिव्हारी लागला आहे. विश्वासाने आघाडीत घेऊन घात केल्याची भावना त्यांची आहे.

प्रक्रिया गटात बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना विनय काेरे यांनी विरोध केला असला तरी ४४८ पैकी १६० मते त्यांच्याकडे घट्ट होती. सत्तारूढ आघाडीच्या काही नेत्यांनी मदन कारंडे व प्रदीप पाटील यांच्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, मताचे पॉकिट व बाबासाहेब पाटील यांच्या संपर्कापुढे त्या नेत्यांचे प्रयत्नही अपयशी ठरले. जरी नेत्यांनी आसुर्लेकरांचा पराभव करायचाच असे ठरविले असते तरी मतदार त्यांच्या हाताला लागले नसते, हेही खरे आहे.

रोख सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे 

कोरे, आवाडे यांच्या आरोपाचा रोख सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे असल्याने निकालाचा जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्याचे पडसाद आगामी बाजार समिती, महापालिका, जिल्हा परिषदेसह लोकसभा निवडणुकीत दिसणार हे मात्र निश्चित आहे.

राखीव गटातही सोयीचे राजकारण

सत्तारूढ गटाच्या राखीव गटातील जागा मोठ्या फरकाने विजयी झाल्या असल्या तरी महिला गटात झालेले मतदान पाहता येथेही सोयीचे राजकारण झाल्याचे स्पष्ट होते.

Web Title: ‘Savkar’, ‘Prakash Anna’ will change the political direction of the district again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.