पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे संजय तेली विशेष कार्य अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी केली नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:48 IST2025-02-04T11:48:42+5:302025-02-04T11:48:58+5:30
जमिनीशी संबंधित किचकट प्रकरणे लवकर निकाली निघण्यात मदत होणार

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे संजय तेली विशेष कार्य अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी केली नियुक्ती
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जमिनी, महसूलसंबंधी कामांचा निपटारा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची समितीच्या विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्याबाबतचा आदेश काढला. यामुळे जमिनीशी संबंधित किचकट प्रकरणे लवकर निकाली निघण्यात मदत होणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील ३ हजार ६४ मंदिरांच्या हजारो एकर जमिनी आहेत. पाच वर्षांपूर्वी समितीने काढलेल्या ढोबळ आकडेवारीनुसार हा आकडा १८ हजार एकर जमिनींचा होता. मात्र, यातील अनेक जागांवर अतिक्रमण, परस्पर खरेदी-विक्री, शर्तभंग झाले आहेत. कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून खंड भरला जात नाही. बऱ्याच जमिनींची खुद्द देवस्थान समितीकडेही नोंद नाही.
जमिनींचे कामकाज तहसीलदार व प्रांत कार्यालयाकडून होते. सध्या जिल्हाधिकारी हे देवस्थान समितीचे प्रशासक असल्याने सगळ्या फायली त्यांच्याकडे सहीसाठी जातात. त्याआधी जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरण समजून घ्यावे लागते, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागते. पत्रव्यवहार, फोन करावे लागतात. यामध्ये खूप वेळ जातो.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. देवस्थानकडून येणाऱ्या सगळ्या फायली आधी त्यांच्याकडून तपासल्या जातील. शहानिशा केली जाईल. जमिनी, महसूलसंबंधीच्या कार्यवाही प्रस्तावित केली जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी एकदा तपासून त्या फायलींवर सह्या करतील.