उपनेतेपदाला किंमत नसल्याचे सांगत संजय पवार यांचा राजीनामा, कोल्हापुरात उद्धवसेनेत पदाधिकारी निवडीवरून नाराजीचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:06 IST2025-07-01T14:05:44+5:302025-07-01T14:06:07+5:30
‘मातोश्री’चा सेवक म्हणून काम करणार

उपनेतेपदाला किंमत नसल्याचे सांगत संजय पवार यांचा राजीनामा, कोल्हापुरात उद्धवसेनेत पदाधिकारी निवडीवरून नाराजीचा स्फोट
कोल्हापूर : उद्धवसेनेचे उपनेते, माजी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीपासून जिल्हाप्रमुख नेमणुकीपर्यंत पक्षाने विश्वासात घेतले नसल्याने राजीनामा देत असल्याचे सांगत गेली ३६ वर्षे ‘मातोश्री‘वर श्रद्धा ठेवून काम केले आणि येथून पुढे शेवटच्या श्वासापर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख पदावर कोणाची नेमणूक केली याला विरोध नाही तर प्रक्रियेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक होते. संजय पवार यांनी इच्छुकांची नावे पक्षप्रमुखांना अनेक वेळा पाठवली होती. पण, शुक्रवारी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचे नाव जाहीर केल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला. सोमवारी, शासकीय विश्रामगृहावर उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
यावेळी, राजीनामा देऊ नका, तुम्ही देणार असाल तर सगळेच राजीनामा देतो, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. पण, ते राजीनाम्यावर ठाम राहिले. पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, अवधूत साळोखे, विराज पाटील, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तूरे, राजू यादव, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते.
सुर्वे यांनी युवासेना जिल्हाप्रमुख, रायगड व कोल्हापूर जिल्हा विस्तारक या पदावर काम केले. ते उद्धवसेनेत जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक होते. पण, पक्षाने त्यांना शहरप्रमुख म्हणून जबाबदारी दिल्याने ते नाराज होते. नवीन जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासोबत आपण काम करणार नसल्याचे सांगत सोमवारी त्यांनी पदांचा राजीनामा देत शिंदेसेनेत प्रवेश केला.
पवार यांना अश्रू अनावर
गेली ३६ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पवार यांची ओळख आहे. पक्षातून सातत्याने होत असलेल्या अवहेलनेमुळे ते काहीसे अस्वस्थ हाेते. पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
पक्षाने खूप दिले..
सामान्य शिवसैनिक ते उपनेतेपद देत असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे उपाध्यक्षपद, राज्यसभेची उमेदवारी देऊन सन्मान केला. पक्षाने आपणाला खूप दिले, पण ज्या पद्धतीने निर्णय घेताना पक्षाकडून वागणूक मिळते, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
हर्षल सुर्वे शिंदेसेनेत
युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख व नवनियुक्त शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनीही पदाचा राजीनामा देत सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत जावून शिंदेसेनेत प्रवेश केला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन हा पक्षप्रवेश घडवून आणला.
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीपासून जिल्हाप्रमुख निवडीपर्यंत विश्वासात घेतले नाही. उपनेते पदाला किमतच नसेल तर त्या पदावर कशासाठी राहायचे? यापुढे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सामान्य शिवसैनिक म्हणून काम करत राहणार. - संजय पवार
मी शहरप्रमुख म्हणून उठावदार काम केले, त्याची दखल घेऊन पक्षाने माझ्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. मी कुणाच्याही कोणत्याही पदाच्या आडवे आलेलो नाही. सर्वांना सोबत घेऊन नवीन जबाबदारी तितक्याच ताकदीने पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. - रविकिरण इंगवले, नूतन जिल्हाप्रमुख उद्धवसेना कोल्हापूर