संजय मंडलिकांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! आज घोषणा शक्य; धैर्यशील मानेंच्या भूमिकेकडेही लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 02:00 PM2022-07-17T14:00:42+5:302022-07-17T14:01:45+5:30

शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

sanjay mandalika likely to left shiv sena announcement possible today also pay attention to the role of dhairyashil mane | संजय मंडलिकांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! आज घोषणा शक्य; धैर्यशील मानेंच्या भूमिकेकडेही लक्ष

संजय मंडलिकांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! आज घोषणा शक्य; धैर्यशील मानेंच्या भूमिकेकडेही लक्ष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांनी आज, रविवारी हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांचा मेळावा बोलविला आहे. यामध्ये ते तशी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्याबाबतीत संशयाचे दाट धुके निर्माण झाले असून, मातोश्रीवरील बैठकीत त्यांनी दोन्ही काँग्रेसची संगत सोडा, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे तेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंडलिक यांचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. तर त्यांच्या स्वीय सहायकांनी मात्र वृत्तपत्रांनी लगेच काही अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्यासोबत गेले. खासदार राहुल शेवाळे व खासदार भावना गवळी यांनी आघाडीची साथ सोडण्याचा सल्ला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला हाेता. मात्र, त्यांनी उघड भूमिका घेतली नव्हती. शिवसेनेच्या १८ पैकी एकही खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या गळाला लागला नव्हता. पक्षप्रमुख ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला चार-पाच खासदार अनुपस्थित होते. मात्र प्रत्येकाने गैरहजेरीबाबत पक्षप्रमुखांना सांगितले होते. त्यामध्ये खासदार मंडलिक यांचाही समावेश होता. बैठकीला ते अनुपस्थित राहिले असले तरी दुसऱ्या दिवशी त्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेतून गेलेले ‘बेन्टेक्स’ असून, राहिलेले अस्सल सोने असल्याची टीका केली होती. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांत मंडलिक गटांतर्गत हालचाली वाढल्या होत्या. ते बंडाचे निशाण घेणार, अशी चर्चा सुरू होती. शिवसेनेच्या शुक्रवारच्या मेळाव्यासही त्यांनी दांडी मारली होती. 

हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे जरी मातोश्रीवरील बैठकीला उपस्थित राहिले असले तरी दोन्ही काँग्रेसपासून फारकत घ्यावी, अशीच त्यांची भूमिका होती. त्यामुळे मंडलिक यांच्या पाठोपाठ तेही उध्दव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्या स्वीय सहायकाने खासदारसाहेब बैठकीत असल्याचे सांगितले.

भाजपचे उमेदवार शक्य...

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मंडलिक व राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली. मात्र महाडिक हे भाजपकडून राज्यसभेवर गेल्याने लोकसभेसाठी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यात मंडलिक यांचे खंदे समर्थक प्रकाश आबिटकर हे शिंदे गटासोबत गेेले. आगामी लोकसभेला शिंदे गट व भाजपचा उमेदवार म्हणून मंडलिक यांना संधी दिली जाऊ शकते. यासाठी आबिटकर यांनी गेल्या आठ दिवसांत मध्यस्थीची भूमिका घेतल्याचे समजते.

राजकीय भूकंपाचे कागलमध्ये स्टेटस

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या समर्थकांचे मोबाइल स्टेटस शनिवारी चर्चेचा विषय ठरले. आज, रविवारी जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार, जय महाराष्ट्र या आशयाच्या स्टेटसमुळे मंडलिक यांच्या बंडाला दुजोरा मिळत आहे.

जिल्हा बँकेपासून अस्वस्थता...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासूनच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व मंडलिक यांच्यात दुरावा तयार झाला. मुश्रीफ व संजय घाटगे गटाचे मनोमिलन मंडलिक यांना आवडले नव्हते. कागलच्या राजकारणात आता मंडलिक व समरजित घाटगे गट एकत्र येऊ शकतात.

 

Web Title: sanjay mandalika likely to left shiv sena announcement possible today also pay attention to the role of dhairyashil mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.