Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:06 AM2024-10-30T11:06:18+5:302024-10-30T11:10:55+5:30
Ajit pawar vs Sharad Pawar NCP: ५५ जागाच जागा वाटपात वाट्याला आल्यावर अजित पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
लोकसभा निवडणुकीसारखीच विधानसभेला पवार कुटुंबामध्ये लढाई सुरु झालेली आहे. बारामतीत काका-पुतण्यामध्ये पुन्हा लढा सुरु झाला आहे. शरद पवारांनीअजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना उभे केले आहे. शिवसेना कोणाची, तसेच राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्नही लोकांच्या मनात कायम आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. राष्ट्रवादीतील उभी फूट, पवार कुटुंबात आलेले वितुष्ट आदी गोष्टींना पुन्हा सुरुवात झाली आहे. दिवाळी आणि निवडणूक एकत्र असल्याने पवार कुटुंबीय एकत्र येणार का, असा सवाल विचारला जात आहे. अशातच राजकारणातही शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांना एबीपी माझ्याच्या कार्यक्रमात हा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, काँग्रेस-शिवसेना एकत्र येईल असे तुम्हाला वाटले होते का, असा सवाल करत भविष्यात दोन्ही पवार गट एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले आहेत.
याचबरोबर अजित पवारांनी शरद पवारांच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिले. कोर्टात जाण्यासाठी आम्ही सांगितले होते का असा सवाल करत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंनाही लक्ष्य केले. मुलीच्या वाढदिवसाला तिला कोर्टात घेऊन जाणे गरजेचे होते का, असे करून सहानुभूती मिळवायची होती का, असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे.
कमी जागा का घेतल्या...
५५ जागा वाटपावर अजित पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. उमेदवारी अर्ज मागे घेणार तेव्हा तुम्हाला समजेल. अधाशासारख्या जास्त जागा घेऊन शून्य निवडून आणायच्या नाहीत. आवाक्यात जागा घेऊन त्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न आहेत.