सांगली : आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या ; रविकांत तुपकर यांचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:15 IST2018-09-11T13:44:48+5:302018-09-11T14:15:41+5:30
देश व राज्यातील भाजपचे सरकार फसवे असून, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आगामी निवडणुका या मतदान पत्रिकेवर घ्याव्यात, असे आव्हान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार बैठकीत दिले. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सांगली : आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या ; रविकांत तुपकर यांचे आव्हान
इस्लामपूर : देश व राज्यातील भाजपचे सरकार फसवे असून, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आगामी निवडणुका या मतदान पत्रिकेवर घ्याव्यात, असे आव्हान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार बैठकीत दिले. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी तुपकर इस्लामपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, राज्यातील लोकसभेच्या सात जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये हातकणंगले, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, माढा, धुळे—नंदुरबार या मतदारसंघांचा समावेश आहे. विधानसभेबाबत विभागनिहाय कार्यकारिणी बैठका घेऊन उमेदवार चाचपणी करीत आहोत.
स्वाभिमानीने कधीही जाती—पातीचे राजकारण केले नाही. ज्यांना पदे दिली, ते सर्व कार्यकर्ते बहुजन समाजातील आहेत. चळवळीत कधी जात बघितली जात नाही. स्वाभिमानीच्या प्रत्येक आंदोलनाचा सर्व जाती—धर्मातील शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
मात्र या विभागात भाजपचा एक मोठा नेता काही असंतुष्ट कार्यकर्त्यांना रसद पुरवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. तो यशस्वी होणार नाही. पेठवडगाव येथे झालेला मेळावा हा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.