कोल्हापूर : नवीन लिलाव बंद असल्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून वाळूचे दर वाढतच आहेत. तीन ब्रास वाळूच्या एका ट्रकसाठी १८ ते २० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूची टंचाई आणि वाढलेल्या दरांमुळे कोल्हापुरातील बांधकाम व्यवसायातील कामांची गती मंदावली आहे.जिल्ह्यात वर्षभरापासून वाळूचे लिलाव आणि औटी बंद आहेत. त्यामुळे विजापूर, गोकाक, सातारा, आदी ठिकाणांहून येथील बांधकाम व्यावसायिकांना वाळू खरेदी करावी लागत आहे. औटी अजूनही सुरू झालेल्या नसल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून वाळूचे दर वाढतच आहेत. एरव्ही १२ ते १३ हजार रुपयांना येणाऱ्या तीन ब्रास वाळूच्या ट्रकसाठी आता १८ ते २० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाढलेले दर आणि त्यातच वाळूची टंचाई असल्याने कोल्हापुरातील गृह, व्यावसयिक बांधकाम प्रकल्पांच्या कामांची गती मंदावली आहे. ज्यांना काम थांबविणे परवडणारे नाही, असे बांधकाम व्यावसायिक वाढीव दराने वाळू खरेदी करीत आहेत. काहींनी बांधकामासाठी क्रश सॅँडचा पर्याय निवडला आहे. मात्र, बांधकामात ‘फिनिशिंग’ मिळत नसल्याने त्याऐवजी वाळू मिळेल त्याप्रमाणे काम सुरू ठेवले आहे. (प्रतिनिधी)दरवाढ आणि टंचाईमुळे बांधकाम व्यावसायिकांना काम करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे कामांची गती मंदावली आहे. कोल्हापुरात वाळूचे लिलाव सुरू करा, या मागण्या जिल्हा प्रशासनाकडे करून आम्ही थकलो आहोत. त्यामुळे आता महसूलमंत्र्यांना भेटून पर्यावरण विभागाशी चर्चा करून लिलाव, औटी सुरू करण्याची मागणी करणार आहोत.- गिरीश रायबागे(अध्यक्ष, क्रिडाई, कोल्हापूर)एक ब्रास वाळूसाठी नऊ हजार रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय मिळणारी वाळू डेपोमधील असून ती मातीमिश्रित आहे. लिलाव, औटी बंद असल्याने वाळूटंचाई भासत आहे. चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे काम संथगतीने सुरू आहे. व्यवसाय अडचणीत आला असून राज्य शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन लिलाव, औटी सुरू कराव्यात.- कृष्णात पाटील(बांधकाम व्यावसायिक)
वाळू महागली, बांधकामे मंदावली
By admin | Updated: December 6, 2014 00:25 IST