‘विक्रीकर’च्या लिपिकाने केला दहा लाखांचा अपहार

By Admin | Updated: April 21, 2015 01:01 IST2015-04-21T00:56:17+5:302015-04-21T01:01:26+5:30

बोगस सह्यांद्वारे साहित्याची परस्पर विक्री

The sales tax clerk has slapped a loss of Rs 10 lakhs | ‘विक्रीकर’च्या लिपिकाने केला दहा लाखांचा अपहार

‘विक्रीकर’च्या लिपिकाने केला दहा लाखांचा अपहार

कोल्हापूर : कोल्हापूर भांडार विभागाकडून खरेदी केलेले स्टेशनरी साहित्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून त्याची परस्पर विल्हेवाट लावून सुमारे दहा लाखांचा अपहार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.
याप्रकरणी विक्रीकर भवनातील लिपिकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित लिपीक अमित विठ्ठल बळप (रा. कांबळवाडी, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. या अपहाराच्या प्रकाराने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, विक्रीकर कार्यालयाकडून कोल्हापूर भांडार विभागाकडून चार टप्प्यांत स्टेशनरी साहित्य मागविले होते. दोन टप्प्यांतील साहित्य पोहोच झाले. उर्वरित दोन टप्प्यांतील साहित्य पोहोच न झाल्याने विक्रीकर विभागातील आस्थापना अधिकारी अजितकुमार भीमराव महिषी यांनी भांडार विभागाकडे चौकशी केली असता ५ सप्टेंबर व ३ आॅक्टोबर २०१३ या दोन टप्प्यांत साहित्याची उचल झाल्याचे कागदोपत्री दिसले.
संशयित लिपीक अमित बळपने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बनावट दस्तावेज बनवून त्याद्वारे सुमारे दहा लाख किमतीच्या साहित्याची परस्पर विक्री केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्याच्या विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
बळप याने हे साहित्य कोणाला विकले, तसेच यापूर्वी आणखी कोणत्या साहित्याची परस्पर विक्री केली आहे का? या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण कुलकर्णी करत आहेत. (प्रतिनिधी)


वरिष्ठांकडे बडतर्फीसाठी प्रस्ताव
कोल्हापूर भांडार विभागाकडून खरेदी केलेले स्टेशनरी साहित्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्णा करून त्याची परस्पर विल्हेवाट लावून दहा लाखांचा अपहार करून शासनाची फसवणूक करणारा लिपीक अमित बळप याला तत्काळ निलंबित करा, या मागणीचा प्रस्ताव अप्पर विक्रीकर आयुक्त व्ही. एस. इंदलकर यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: The sales tax clerk has slapped a loss of Rs 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.