सावता माळी बाजाराच्या उद्घाटनालाच लाखाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:37+5:302021-01-18T04:21:37+5:30
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ तर ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा या हेतूने कोल्हापुरात कृषी विभागातर्फे संतशिरोमणी ...

सावता माळी बाजाराच्या उद्घाटनालाच लाखाची विक्री
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ तर ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा या हेतूने कोल्हापुरात कृषी विभागातर्फे संतशिरोमणी सावता माळी यांच्या नावाने बाजार सुरू करण्यात आला आहे. कसबा बावडा येथील चाळीसठाणा या कृषी विभागाच्या व्हरांड्यात भरलेल्या बाजाराचे रविवारी उद्घाटन झाले. सकाळी ९ ते दुपारी १ असे चारच तास भरलेल्या या बाजारात १ लाख १२ हजार १२० रुपयांची विक्री झाली. शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसले.
शासनाने कृषीमालाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्याची पत सुधारावी म्हणून विकेल ते पिकेल हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री करण्यासाठी केंद्र उघडण्याचे ठरले. आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातर्फे चाळीसठाणा येथील पहिल्या केंद्राचे उद्घाटन रविवारी आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या उपस्थितीत झाले. आचारसंहिता असल्याने कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने कार्यक्रम झाला. प्रतिसाद पाहून बाजाराची व्याप्ती आणखी वाढवली जाईल असे सांगण्यात आले.
चौकट ०१
पहिल्याच दिवशी ६ शेतकरी कंपन्या, ८ शेतकरी गट आणि ३० वैयक्तिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सेंद्रिय भाजीपाल्यासह हळद, घाण्याचे तेल, गूळ हे देखील विक्रीला ठेवले होते. शेतकऱ्यांकडून कोणतीही बाजार फी घेतली गेली नाही.
चौकट ०२
व्यापाऱ्यांना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कार्ड
शेतकरी बाजारात व्यापारी घुसखोरी करत असल्याचा पूर्वानुभव असल्यानेच यावेळी कृषी विभागाने आधीपासूनच दक्षता घेतली आहे. शेतकऱ्यांना कार्ड तयार करून दिली आहेत. कार्ड असणाऱ्यांनाच परवानगी दिली आहे. त्यामुळे आपोआपच गैरप्रकारांना अटकाव बसला आहे.
चौकट ०३
शासकीय कार्यालयात केंद्र सुरू होणार
चाळीसठाणा या कृषी कार्यालयातील बाजार फक्त दर रविवारी भरणार आहे. याउलट कृषी विभागाने निश्चित केलेली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मुख्य प्रशासकीय इमारत, पशुसंवर्धन कार्यालय, मत्स्यव्यवसाय केंद्र, मार्केट यार्ड या ठिकाणी मात्र दररोज संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या कार्यालय सुटण्याच्या वेळेस नोकरदारांनी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करावा अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोमवारपासून टप्प्याटप्प्याने ही केंद्रे सुरू होणार आहेत.
फोटो: १७०१२०२१-कोल- सावता माळी बाजार
फोटो ओळ : कोल्हापुरात आत्मा व कृषी विभागातर्फे सावता माळी बाजार उपक्रम सुरू केला आहे. रविवारी कसबा बावड्यातील चाळीसठाणा येथील केंद्रावर शेतमाल खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.