उशिरा येणे भोवले, कोल्हापूर महापालिकेच्या ११ अधिकाऱ्यांचा पगार कापला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:24 IST2025-01-31T12:23:50+5:302025-01-31T12:24:06+5:30
नावे नकोत म्हणून धडपड

उशिरा येणे भोवले, कोल्हापूर महापालिकेच्या ११ अधिकाऱ्यांचा पगार कापला
कोल्हापूर : महापालिकेतील आढावा बैठकीला उशिरा आल्याने गुरुवारी उपायुक्त, सहायक आयुक्तासह ११ अधिकाऱ्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी कापला. अभ्यागतांना नेहमी उशिरा येणे, काम वेळेत न करण्याचा अनुभव येतोच. पण, पूर्वसूचना देऊनही मनमानी पद्धतीने उशिरा येण्याचा अनुभव प्रशासक मंजुलक्ष्मी यांनाच खुद्द आल्याने त्यांनी थेट लेट कमर्सच्या पगारालाच कात्री लावली.
महापालिकेच्या मुख्यालयात प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता आयुक्त कार्यालयात सर्व अधिकारी व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजित केली होती. प्रशासक मंजुलक्ष्मी वेळेत आल्या. त्यावेळी केवळ तीन ते चारच अधिकारी उपस्थित होते. उर्वरित अधिकारी ११.१५ मिनिटांपर्यंत येत राहिले. उशिरा आल्याने ११ जणांना अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचा आदेशच काढला. यामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली.
दरम्यान, सायंकाळी अचानकपणे शिवाजी मार्केटमधील कार्यालयांनाही त्यांनी भेट दिली. त्यावेळी प्राथमिक शिक्षण समिती, विवाह नोंदणी व विधी विभागामधील आठ कर्मचारी जाग्यावर नव्हते. त्यांचाही अर्ध्या दिवसाचा पगार कापण्याचे आदेश दिले.
नावे नकोत म्हणून धडपड
उशिरा आल्याने पगार कपातीची शिक्षा झालेले काही अधिकारी आपली नावे वृत्तपत्रांत येऊ नये, यासाठी रात्री उशिरापर्यंत धडपडत होते. नावांची यादी बाहेर जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात होती.
प्रमुख अधिकारीच
बैठकीला उशिरा आल्याने पगार कापलेले अधिकारी असे : उपायुक्त पंडित पाटील, सहायक आयुक्त नेहा आकोडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, उपशहर अभियंता सुरेश पाटील, रमेश कांबळे, वर्कशॉप प्रमुख विजयकुमार दाभाडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, नगरसचिव सुनील बिद्रे, स्थानिक संस्था कर अधिकारी विश्वास कांबळे, कनिष्ठ अभियंता चेतन आरमाळ.
आणखी आठ जणांवरही कारवाई
कार्यालयात उपस्थित नसल्याने पगार कापलेले कर्मचारी असे : प्राथमिक शिक्षण मंडळातील कनिष्ठ लिपिक शिरीष शिंदे, जगदीश ठोंबरे, विधी अधिकारी संदीप तायडे, विधी विभागातील कनिष्ठ लिपिक सरिता संकपाळ, शिपाई नितीन कांबळे, सतीश बागडे, विवाह नोंदणी अधीक्षक सुजाता गुरव, पवडी कामगार सोनल जाधव.