साई, हाय-टेक उपांत्य फेरीत
By Admin | Updated: April 23, 2015 00:59 IST2015-04-21T00:10:34+5:302015-04-23T00:59:03+5:30
जीएफएल : आॅप्टेगन शुगर्स, जय-वरदसह कळेकर फायटर्सही अंतिम चारमध्ये

साई, हाय-टेक उपांत्य फेरीत
गडहिंग्लज : गडहिंग्लज फुटबॉल सिटी व केदारी रेडेकर फौंंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या गडहिंग्लज फुटबॉल लिग (जीएफएल) स्पर्धेत आजच्या तिसऱ्या दिवशी साई रॉयल्स, हाय-टेक आॅप्टेगन शुगर्स, जय-वरद व कळेकर फायटर्स संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. साई रॉयल्स विरुद्ध हायटेक आॅप्टेगन शुटर्स हे दोन्ही संघ तुल्यबळ होते. पूर्वार्धात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळाचे प्रदर्शन केले. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून चढाया होत होत्या. अखेर हा सामना बरोबरीत सुटला.साईकडून महंमद जमखंडी, प्रकाश होडगे, विकास जाधव यांनी चांगला खेळ केला, तर हाय-टेककडून राहुल चौगुले, महेश जगताप यांनी चांगला खेळ केला.
अे. के. टायगर्स विरुद्ध जय-वरद स्पोर्टस् या दोन्ही संघांना सामना महत्त्वाचा होता. सामन्याच्या ८व्या मिनिटाला टायगर्सच्या पंकज दाभोळकरच्या चुकीमुळे ओन गोल स्वत:च्या संघावर झाला. त्यामुळे जय-वरद स्पोर्टस्ला १-०ची आघाडी मिळाली. पूर्वार्धात सामना बरोबरीत सुटला. उत्तरार्धात टायगर्सकडून परतफेड करण्यासाठी टायगर्सकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन झाले.
४० व्या मिनिटाला चेतन सुतार या नवोदित खेळाडूने उत्कृष्ट गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला व सामना रंगतदार केला. टायगर्सच्या बंटी मोरे, अजित शिंदे या सीनियर खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता पहिला तर दुपारी १२ वाजता दुसरा सामना होणार आहे. (प्रतिनिधी)