बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:57+5:302021-01-22T04:22:57+5:30

चंदगड : बेळगाव महानगरपालिकेवर कन्नड रक्षणवेदिके संघटनेने लावलेला लाल-पिवळा ध्वज काढण्यात यावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी शिनोळी ...

Saffron will be thrown on Belgaum Municipal Corporation | बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवणारच

बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवणारच

चंदगड : बेळगाव महानगरपालिकेवर कन्नड रक्षणवेदिके संघटनेने लावलेला लाल-पिवळा ध्वज काढण्यात यावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी शिनोळी (ता. चंदगड) येथील सीमेवर कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवणारच, अशी भूमिका शिवसेनेने घेतली.

दरम्यान, बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी बेळगाव सीमेवर शिनोळी येथे अडविले. त्यावेळी शिवसैनिक व कर्नाटक पोलिसांत जोरदार झटापट झाली. शिवसेनेने बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर कर्नाटक सीमेवरच ठिय्या आंदोलन करून कर्नाटक सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.

पंधरा दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिके संघटनेने महानगरपालिका कार्यालयावर लाल-पिवळा ध्वज लावला. स्थानिक स्वराज संस्थेवर कर्नाटक सरकार दडपशाही करत आहे. हा ध्वज काढावा, अशी मागणी बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी केली होती. त्यावर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. कोल्हापूरहून शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते बेळगावला जाऊन निषेध नोंदवणार होते. त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संंजय पवार, सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, संघटक संग्राम कुपेकर, सुजित चव्हाण, प्रतीक क्षीरसागर, विराज पाटील, संभाजी पाटील, अ‍ॅड. संतोष मळवीकर, शांता जाधव, संज्योती मळवीकर, अशोक मनवाडकर आदींसह कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी... जय शिवाजी..., बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत कर्नाटकात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र बेळगाव पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावरच अडवून कार्यकर्त्यांच्या हातातील भगवे झेंडे काढून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शिवसैनिक व पोलिसांत झटापट झाली. याप्रकरणी बेळगाव येथे मराठी भाषिक संघटना, महाराष्ट्र एकीकरण समिती आंदोलन करणार होती. मात्र, पोलीस प्रशासनाने वेळ देण्याचे मान्य केल्यावर, ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

--------

* तिघाविरुद्ध बंदी आदेश

कोनेवाडी येथे भगवे झेंडे फडकवून कर्नाटक सरकारला इशारा दिल्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, संघटक संग्राम कुपेकर यांना बेळगाव जिल्हाबंदी करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या तिघांविरोधात हा बंदी आदेश लागू केला आहे.

-

* कोनेवाडीत भगवा फडकवलाच

शिवसेनेचे कार्यकर्ते शिनोळी मार्गे बेळगावात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाल्याने बुधवार (दि. २०) मध्यरात्रीपासूनच कर्नाटकने शिनोळी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, पोलिसांना चकवा देऊन जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, संघटक संग्राम कुपेकर, सुजित चव्हाण, प्रतीक क्षीरसागर, विराज पाटील, संभाजी पाटील, अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) गावी जाऊन ब्रम्हलिंग युवक मंडळाच्या कार्यालयासमोर भगवा झेंडा डौलाने फडकविला.

-- १) फोटो ओळी : शिनोळी (ता. चंदगड) येथून कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना अडविताना पोलीस व शिवसैनिकांत झालेली झटापट.

क्रमांक : २१०१२०२१-गड-०७ २) कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे गनिमीकाव्याने जाऊन भगवा झेंडा फडकवताना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संंजय पवार, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, संग्राम कुपेकर, सुजित चव्हाण व प्रतीक क्षीरसागर.

क्रमांक : २१०१२०२१-गड-०८ ३) बेळगाव महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी जात असताना शिवसैनिक.

क्रमांक : २१०१२०२१-गड-०९

Web Title: Saffron will be thrown on Belgaum Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.