लोकांच्या मदतीला धावून जाणे हाच खरा वाढदिवस सतेज पाटील यांची भावना : शुभेच्छा द्या; परंतु उत्सवाचे स्वरूप नको..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:41+5:302021-04-11T04:24:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे सामान्य जनता भीतीच्या सावटाखाली असताना लोकांच्या ...

Running to the aid of the people is the real birthday of Satej Patil. But not the nature of the celebration. | लोकांच्या मदतीला धावून जाणे हाच खरा वाढदिवस सतेज पाटील यांची भावना : शुभेच्छा द्या; परंतु उत्सवाचे स्वरूप नको..

लोकांच्या मदतीला धावून जाणे हाच खरा वाढदिवस सतेज पाटील यांची भावना : शुभेच्छा द्या; परंतु उत्सवाचे स्वरूप नको..

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे सामान्य जनता भीतीच्या सावटाखाली असताना लोकांच्या मदतीला धावून जाणे हाच माझा वाढदिवस साजरा करण्यासारखे आहे, अशी भावना पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. मंत्री पाटील यांचा आज, सोमवारी वाढदिवस होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यास ते उपलब्ध नाहीत. कार्यकर्त्यांनीही शुभेच्छा जरूर द्याव्यात, तुमच्या शुभेच्छांचे पाठबळ कायम हवेच आहे; परंतु यंदा कोरोनाची स्थिती असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरूप देऊ नये, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखणे हाच खरे तर माझा यावर्षीचाही वाढदिवसाचा संकल्प असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आपण अधिक योग्यरीतीने या संसर्गाला सामोरे जात आहोत. गेल्या वर्षी पीपीई कीटपासून पायाभूत सुविधांपर्यंत अनेक गोष्टींची कमतरता होती. पीपीई कीट मिळत नव्हती म्हणून कापड आणून इचलकरंजीतून ती शिवून घेतली. लोकांत भीतीचे वातावरण होते. यंदा तशी स्थिती नाही. लोकांतील भीती कमी झाली आहे, शिवाय कोरोनाबद्दल जागरूकताही आली आहे. किमान चार हजार रुग्णांची उपचाराची व्यवस्था उभी केली आहे. गडहिंग्लज, इचलकरंजी व कोल्हापुरातील आयसोलेशन रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर दिले आहेत. सीपीआरमध्ये टँकच उभारला आहे. वीस हजार लिटर आॉक्सिजनचा टँक बसविणारा कोल्हापूर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा असावा. नो मास्क...नो एंट्री ही मोहीम आपण घेतली. ती नंतर राज्य सरकारनेही स्वीकारली. प्रशासनातील अगदी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी उत्तम समन्वय ठेवून रात्रंदिवस काम केल्यामुळेच आपण गतवर्षी कोरोनावर मात करू शकलो. यंदाही तसेच नियोजन केले आहे.

ते म्हणाले, माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, त्यांनी या संकटात लोकांच्या मदतीला धावून जावे. मी मास्क वापरणार तुम्हीही वापरा ही मोहीम आम्ही राबवीत आहोत. मी रक्तदान केले तुम्हीही करा असेही आवाहन केले आहे. कोविड रुग्णांना आधार द्या. अडचणीत सापडलेल्या कष्टकरी, हातावर पोट असलेल्या श्रमजिवी जनतेला तुम्ही मदत करा. त्यांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना आधार देणे यासारखा दुसरा आनंद नाही. जिथे रक्त कमी पडेल तिथे रक्तदानासाठी पुढे आहे. कुठे रुग्णांसाठी पोळी-भाजी पुरविण्याची गरज निर्माण झाली तर तशी यंत्रणा उभी करा...प्रशासन आपल्या पातळीवर सगळ्या उपाययोजना करीत आहेच; परंतु सामाजिक बांधीलकी व लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या कोल्हापूरच्या परंपरेप्रमाणे आपण या संकटाला सगळे मिळून सामोरे जाऊ या...

लोकांत कोरोनाबद्दल जागरूकता निर्माण झाल्यामुळेच यंदा अन्य जिल्ह्यांत कोरोनाचा विस्फोट झाला असतानाही कोल्हापुरात अजूनही कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. तशीच राहायची असेल तर लोकांचे सहकार्य फार महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले, लोकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे. बाहेरगावांहून आलेल्या लोकांमुळे गेल्यावर्षी संसर्ग वाढला होता. यंदा ते प्रमाणही कमी आहे. जे बाहेरून आले ते आपलेच बांधव आहेत व ते देखील पुरेसी दक्षता घेत आहेत. गेल्यावर्षी आम्हाला संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शोधमोहीम राबवावी लागली. यंदा स्वत:हून लोक उपचारांसाठी पुढे येत आहेत.

काँग्रेस पक्षाने सत्तेची संधी दिली म्हणूनच लोकांसाठी चांगले काम करू शकलो असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कायमच विश्वास दर्शविला. मागच्या पंचवार्षिकमध्ये एकही आमदार नव्हता तिथे आता जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, बाजार समितीमध्ये पक्षाची सत्ता आहे. त्याशिवाय नगरपालिका, साखर कारखान्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. काँग्रेस समितीतूनच पक्षाचे सगळे निर्णय होत आहे. तालुका पातळीवरील संघटनही मजबूत झाले आहे. पक्षाने एखादा कार्यक्रम जाहीर केला तर त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होते. कोरोनाच्या काळात पक्ष म्हणूनही आम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलो. काँग्रेसकडून सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचे युनिट वाटप केले. लहान व्यावसायिकांना स्प्रे भेट दिले. त्याशिवाय परराज्यात गावी निघालेल्या लोकांसाठी खास रेल्वेची व्यवस्था केली. अशा तब्बल २५ रेल्वेतून ३२ हजार ३९५ मजुरांना गावी पाठवू शकलो. त्यांच्या रेल्वेतील दोन दिवसांच्या प्रवासातील जेवणाची सोय केली. लहान मुलांसाठी दुधाच्या बाटलीचीही व्यवस्था केली. झोपडपट्टीतील गोरगरीब जनतेला धान्याचे घरपोहोच वाटप केले.

कोरोना संशयितांवर कोविड सेंटरमध्येच उपचार होणार

पुण्यासह अनेक शहरात कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या लोकांनी घरीच राहणे पसंत केले. हे लोक घरात न राहता सर्वत्र फिरत राहिल्याने संसर्ग झपाट्याने वाढला व त्यातून पूर्ण अपार्टमेंटच पॉझिटिव्ह झाल्याचे अनुभव आहेत. म्हणून एकाही रुग्णांवर घरी राहून उपचार करण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यांच्यासाठी कोविड काळजी केंद्राची पुरेशी व्यवस्था उभी करीत आहोत. त्यातील पहिले केंद्र विद्यापीठातील डीओटीमध्ये सुरू करीत आहोत. हवे तर रुग्ण घरचा डबा आणून तिथे खाऊ देत; परंतु उपचार मात्र तिथेच होतील.

ग्रामसमित्या पुन्हा सक्रिय करणार

जिल्ह्यांत निम्म्यांहून अधिक गावांत निवडणुका झाल्याने नवे लोक निवडून आले आहेत. त्यांना विश्वासात घेऊन तातडीने ग्राम समित्या कशा सक्रिय होतील असे नियोजन केले आहे. आपापली गावे लोकांनी सुरक्षित राखली तरच हा संसर्ग रोखणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Running to the aid of the people is the real birthday of Satej Patil. But not the nature of the celebration.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.