कोल्हापूरात पूरस्थिती, पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली; एनडीआरएफ पथक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 01:48 PM2021-07-22T13:48:05+5:302021-07-22T13:48:23+5:30

कोल्हापुरात अतिवृष्टीने उडवली दाणादाण..

the river Panchganga crossed the warning level; NDRF squad filing in Kolhapur | कोल्हापूरात पूरस्थिती, पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली; एनडीआरएफ पथक दाखल

कोल्हापूरात पूरस्थिती, पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली; एनडीआरएफ पथक दाखल

googlenewsNext

कोल्हापूर: गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पंचगंगा नदीने गुरुवारी दुपारी ३९ फूट या इशारा पातळी ओलांडली आहे. ८३ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर ते रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, गडहिग्लज, चंदगड असे प्रमुख राज्यमार्ग वाहतूकीसाठी पूर्ण बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे. बर्की (ता. शाहूवाडी) गावाचा संपर्क तुटला असून संध्याकाळपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे.

ढगफुटीसदृश्य पाऊस

जिल्ह्यात मंगळवारपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. बुधवारपासून सुरु झालेला पावसाचा धिंगाणा गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह डोंगराळ तालुक्यात तर ढगफुटीसदृश्य अवघ्या कांही तासातच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

रत्नागिरी, गगनबावडा, चंदगड मार्ग बंद

भूईबावडा, करुळ घाटात दर कोसळल्याने कोकणात जाणारी वाहतूक आंबोली व फोंडा घाटामार्गे वळवण्यात आली आहे. पण तेथे अनेक लहान मोठ्या ओढ्यांवर पाणी आल्याने राज्यमार्ग वाहतूकीसाठी बंद झाले आहेत. आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. आजरा ते गारगोटी, उत्तूर ते गडहिग्लज ते चंदगड मार्ग बंद आहे.

पंचगंगा इशारा पातळीवर

पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे तर इशारा पातळी ३९ फूट आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी ३८ फुट ८ इंच झाली असून कोणत्याही क्षणी नदी इशारा पातळी ओलांडणार असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी अतिवृष्टी कायम राहणार असल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत पंचगंगा नदी ४३ फूट ही धोक्याची पातळी ओलांडेल असा इशारा आहे.

पाऊस रविवारपर्यंत

पाऊस रविवारपर्यंत असाच कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पूर आणि दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

राधानगरी धरण ६६ टक्के भरले

राधानगरी धरण ६६ टक्के भरले आहे. ९७ टक्के भरल्याशिवाय धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडत नाही. त्यामुळे सध्या फक्त सांडव्यावरुन भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे.

अलमट्टीतून ९७ हजार क्यूसेक विसर्ग

पाऊस वाढल्याने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्यस्थितीत प्रति सेकंद ९७ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कोल्हापूर, सांगलीतील पंचगंगा, कृष्णेचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे.

Web Title: the river Panchganga crossed the warning level; NDRF squad filing in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.