आगीच्या घटनेकडे पूर्वसंकेत म्हणून पाहणे आवश्यक
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या घटनेकडे पूर्वसंकेत म्हणून पाहणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय तपासणी पथकाने आयजीएम रुग्णालयातील त्रुटींबाबतचा अहवाल दिला आहे. त्याचबरोबर 'लोकमत' नेही यावर प्रकाश टाकला आहे तरीही प्रशासनाने रुग्णालयातील इलेक्ट्रिकल दुरूस्ती व आग विझविण्याबाबतची अत्याधुनिक यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहिले नाही. या घटनेनंतर तरी आता ‘आयजीएम’कडे बघणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.
आयजीएम रुग्णालय किमान ३०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल निर्माण होऊ शकते; परंतु सध्या तेथे फक्त २०० बेडची व्यवस्था आहे. त्यातही ४० ते ६० अतिरिक्त रुग्ण दाखल असतात. रुग्णालयात बेड व गाद्या धूळखात पडून आहेत. हे बेड बसविण्यासाठी जागाही उपलब्ध आहे; परंतु आवश्यक कर्मचारी नाहीत. रुग्णालयात २०० रुग्णांसाठी १५ डॉक्टर आवश्यक असताना तीनच उपलब्ध आहेत. नर्स, वॉर्डबॉय, टेक्निशियन, इतर स्टाफ व स्वच्छता कर्मचारी कमी आहेत. रुग्णालयातील गर्दी, रुग्ण व नातेवाईक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक नाहीत. अशा अडचणीच्या परिस्थितीतून उपस्थित असणाऱ्या प्रमुख डॉक्टरांना रुग्णालय चालवावे लागत आहे.
त्याचा विपरित परिणाम रुग्णांवरील उपचारावर होत आहे. अति गरजेनुसारच रुग्णाकडे लक्ष दिले जाते. नियमित प्रत्येक रुग्णांवर लक्ष ठेवणे अशक्य बनले आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. दुरुस्तीसाठी आवश्यक निधी नाही. या सर्व प्रकारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्हास्तरावरून तपासणीसाठी आलेल्या पथकाने रुग्णालयातील इलेक्ट्रिकल व फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट केले आहे. रुग्णालयांत अनेक ठिकाणी वायरी धोकादायकरित्या लोंबकळत आहेत. विद्युत पेटी मोडकळीस आली आहे. अशा जुन्या वायरींमुळे आगीसारख्या भयानक घटना घडतात, याची अनेक मोठी उदाहरणे डोळ्यांसमोर आहेत. तरीही धोकादायक स्थितीत काम सुरू आहे.
मंगळवारी घडलेल्या घटनेतून धडा घेत या दुरूस्तीकडे गांभीर्याने पाहून त्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
उपस्थितांचे प्रसंगावधान
रुग्णालयात हजर असणाऱ्या वॉर्डबॉय, नर्स व सुरक्षा रक्षकाने रुग्णालयातील अग्निरोधक बंब फोडून त्यातून पावडरची फवारणी करत तत्काळ आग विझवली. या बंबाचा वापर करण्याचे प्रशिक्षण त्यांना दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेच्या आपत्कालिन विभागाने दिले होते. त्याचा मंगळवारी उपयोग झाला; अन्यथा बंब असूनही वापरता येत नसता, तर बघत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. यातून बोध घेत सर्व ठिकाणी अधिकाधिक लोकांना अग्निरोधक बंब वापरण्याचे व आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.