ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांची भरारी, विंचवाच्या दोन नवीन प्रजातींचा लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 13:36 IST2022-02-26T13:04:48+5:302022-02-26T13:36:44+5:30
संशोधन केलेली भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहिली प्रजाती आहे

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांची भरारी, विंचवाच्या दोन नवीन प्रजातींचा लावला शोध
संदीप आडनाईक
कोल्हापूर : जळगाव जिल्ह्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांनी विंचवाच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. महाराष्ट्रातील विवेक वाघे (जळगाव), मूळचे सोलापूरचे सतपाल गंगलमाले आणि मूळचे सांगलीचे अक्षय खांडेकर या सध्या कोल्हापुरात वास्तव्य करणाऱ्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. हे तिघेही ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे सदस्य आहेत.
विंचवाच्या या दोन नवीन प्रजाती बुथीडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील वाघझिरा आणि खिरोदा या गावांत ही प्रजाती आढळून आली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही प्रजाती आढळली म्हणून तिचे नामकरण सातपुडा पर्वतावरुन कॉमसोबुथस सातपुराएनसीस (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आले आहे.
जगभरात कॉमसोबुथस या विंचवाच्या जातीच्या ५० प्रजाती आढळून येतात. संशोधन केलेली भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहिली प्रजाती आहे. रंग, शेपटीवरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरिरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातींपेक्षा वेगळी ठरते.
नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून, ती माळराने, झुडपी जंगले व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोशाने आढळून येते. २०२०च्या ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा ही प्रजाती आढळून आली होती. साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे लक्षात आले, त्यासंबंधीच्या संशोधनाची तज्ज्ञांनी पुष्टी केल्यानंतर हा शोधनिबंध अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या ‘युस्कोर्पिअस’ या संशोधन पत्रिकेतून गुरुवारी प्रकाशित करण्यात आला.